मुंबईः राज्यात महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे आता केंद्रीय तपास यंत्रणांकडे (Central Agencies) वर्ग करण्यात आले आहेत. मविआ सरकारच्याच काळात केंद्रीय तपास यंत्रणा आमि राज्यातील तपास यंत्रणा यांच्यात गुन्हे दाखल करण्यावरून स्पर्धा सुरु असायची. आता राज्यात भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार आल्याने गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाण आणि खंडणीसंदर्भातील गुन्हा तसेच रश्मी शुक्ला फोन टॅपिंग अहवाल फोडल्या प्रकरणी मुंबई पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसमध्ये देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाच्या वतीने नुकतेच असे निर्देश देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ईडी, सीबीआय, एनआयए यासारख्या यंत्रणा राज्यात सक्रिय झाल्या तर राज्य स्तरावर मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवरही पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर या गुन्ह्यांसंबंधी प्रक्रियांमध्ये आणखी बदल केले जात आहेत.
जळगाव शहरातील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्था चालकाचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांवर गुन्हा दाखल आहे. पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर संचालकांकडून पाच लाखांडी खंडणीदेखील उकळण्यात आल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर आहे. या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, असे निर्देश गृह विभागाने दिले आहेत.
राज्यातील मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी बीकेसी येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस यांचा जबाबही नोंदवला आहे. हा गुन्हादेखील सायबर येथून कुलाबा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. आता सदर गुन्ह्याचा तपासदेखील सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर तपास सीबीआयकडे देण्याचे निर्देश गृह विभागाने दिले आहेत. SID मधील संवेनदनशील माहिती लीक करण्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्यात आले होते. महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांना पैशांचे अमिष देत काही आयपीएस अधिकारी चांगल्या जागांवर पोस्टिंग करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. तत्कालीन एसआयडी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे संबंधित फोन कॉल रेकॉर्ड केल्याचाही दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र हे फोन टॅपिंग बेकायदेशीर असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता.