आदित्य ठाकरेंच्या ‘शिवसंवादा’नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक, औरंगाबादचा दौरा करणार, ठाकरेंना काय उत्तर देणार?

| Updated on: Jul 24, 2022 | 4:50 PM

एकनाथ शिंदेही नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. 30 आणि 31 जुलैला शिंदे या दोन शहरांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलीय. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवादानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक, औरंगाबादचा दौरा करणार, ठाकरेंना काय उत्तर देणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. इतकंच नाही तर आता शिवसेना आपल्याकडेच राखण्यासाठी ठाकरे गटाची धडपड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 40 आमदार आणि 12 खासदार गेले, आता संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी नुकताच नाशिक, औरंगाबाद आणि नगरचा दौरा केला. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेही नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. 30 आणि 31 जुलैला शिंदे या दोन शहरांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलीय. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. शिंदे आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देतील. मुख्यमंत्री आमच्या गावी या मोहिमेअंतर्गत शिंदे नाशिक आणि औरंगाबादचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री 30 जुलैला नाशिक, तर 31 जुलैला संभाजीनगरच्या दौऱ्यावर येतील, आदित्य ठाकरे यांच्या टीकेला ते उत्तर देतील, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिलीय.

आदित्य ठाकरेंची शिंदे, बंडखोरांवर जोरदार टीका

औरंगाबाद दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ‘ही गद्दारी झाली तेव्हा आपण डोळे झाकून बसलो. त्यांनी हातात कधी खंजीर कधी घेतला आपल्याला कळलंच नाही. त्यांनी कितीही सांगितलं तरी त्यांच्या माथ्यावर गद्दार लिहिलेच दिसणार. तुम्हाला सगळं काही दिलं, तुम्हाला काय कमी केलं? तुम्ही गद्दारी का केली? हेच त्यांना हात जोडून नम्रपणे विचारा’, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय.

आपण संभाजीनगर नाव दिल्यानंतर नव्या सरकारनं निर्णयाला स्थगिती दिली. मला वाटतं इकडे सगळ्या संभाजीनगरवासियांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना उपरती आली आणि पुन्हा त्यांनी संभाजीनगर नाव केलं. आपण नाव बदलताना कुठल्याही जाती, धर्मात तेढ निर्माण झाला नाही, कुठे दंगली घडल्या नाहीत, याचा मला अभिमान आहे. आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं. अयोध्येला आपण चार पाच वेळा गेलो. हे सगळं करत असताना कुठेही जात-पात, धर्मावरुन दंगली घडल्या नाहीत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय.