आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवाच, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले (Uddhav thackeray live speech) होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:06 PM, 23 Jan 2020
आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवाच, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले (Uddhav thackeray live speech) होते. आज (23 जानेवारी) वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 11 ज्येष्ठ शिवसैनिकांनी सत्कार केला. या सत्कारानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “गेली 25-30 वर्षे जे आपले विरोधक होते. त्यांचा हातात हात घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणे केलं. चोरुन मारुन केलेले नाही. याचा अर्थ मी भगवा खाली ठेवला असा नाही. ना आमचा रंग आम्ही बदलला ना आमचा अंतरंग आम्ही बदलला. आमचा अंतरंगही भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.”

“आज 23 जानेवारी मला सर्व जुने 23 जानेवारी आठवतात. हाच तो दिवस गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी जे आपल्या निशाणीमध्ये दिसत आहेत. एका हातात रुद्राक्षाची माळ दुसऱ्या हातात शिवबंधन ते बांधून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली हाच तो दिवस”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“माझा सत्कार करण्यात आला. पण मी मनापासून सांगतो. ही नवी जबाबदारी घेतल्यानंतर मी एकही सत्कार स्वीकारला नाही. पण मी हा मुद्दाम स्वीकारला. माझा नाही हा सत्कार तुमचा आहे. मी नक्कीच तुमचा कुटुंब प्रमुख सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी माझ्यावर येईल. त्यापासून मी कधीही पळ काढलेला नाही किंवा काढणार नाही.”

“तुम्ही अप्रतिम सोहळा साजरा केला. पण ही माझी वचनपूर्ती नाही. तर त्या वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे माझं पहिलं पाऊल आहे. मी शिवसेनाप्रमुखांचा हात हातात घेऊन जी शपथ घेतली आहे. तो त्यांचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसवण्याची घेतली आहे. ही जबाबदारी मी जरुर स्वीकारली. ती एवढ्यासाठी स्विकारली. ज्यावेळी आपल्या तेव्हाच्या मित्रपक्षाने दिलेले वचन मोडले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत त्या मंदीरात दिलेला शब्द खाली पाडला. खाली पाडताना असं काही ठरलंच नव्हतं म्हणून मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी नुसता उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणार नाही लढणार आहे.”

“अर्थात कुटुंबप्रमुख म्हटल्यावर जे बोललो ते बोललो. तुमच्यासमोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला काय तोंड दाखवलं असतं. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय भावना असती. की शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलतोय. हे कदापी होणं नाही. प्राण गेला तरी बेहत्तर पण मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही. म्हणून मी हा वेगळा मार्ग स्विकारला. कारण जे 25 किंवा 30 वर्षे आपले विरोधक होते. त्यांचा हातात हात घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणे केलं. चोरुन मारुन केलेले नाही. याचा अर्थ मी भगवा खाली ठेवला असा नाही. ना आमचा रंग आम्ही बदलला ना आमचा अंतरंग आम्ही बदलला. आमचा अंतरंगही भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे.

“मधल्या काळात जी टीका झाली की शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला. 2014 ला तुम्ही आमच्याशी युती तोडली होती. हिंदुत्वावादी शिवसेनेसोबतची युती तेव्हाही तुम्ही तोडली होती. तेव्हा अदृष्य हाताच्या मदतीने सरकार स्थापन केलं होतं आणि आता दिलेला शब्द मोडल्यानंतर आमचा चेहरा उघड झाला असेल. पण तुमचं काय तुम्ही अख्खेच्या अख्खे उघडे झालेले आहात. हे पूर्ण दुनियेने बघितलं आहे.”

“मी जी जबाबदारी स्विकारली ती माझ्या स्वप्नात कधीही नव्हती. मी शिवसेनाप्रमुखांना मी मुख्यमंत्री होईन असं वचन दिलेले नाही. अजिबात नाही. पण ही जबाबदारी स्विकारली. आज जे जुने साथी जे हृदयात घर करुन आहेत.”

“मी हे माझे मुख्यमंत्री पद हा माझा मान आजपर्यंत जे जे शिवसेनेचे नेते किंवा ज्या ज्या शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या. घाम गाळला. रक्त सांडलं. त्यांच्या चरणी समर्पित करतो आहे. या पुढची लढाईला तुमची साथ सोबत आणि संगत पाहिजे आहे. हे माझं सुरक्षा कवचं आहे. शिवसेनाप्रमुखांसोबतही तेच सुरक्षाकवच होतं. हे जो पर्यंत आमच्या सोबत आहे. तोपर्यंत मला कोणाचीही पर्वा नाही.”

या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. या सत्कार सभारंभापूर्वी  अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. अवधुत गुप्ते, अभिजित केळकर, मयुरेश पेम, बेला शेंडे, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांसह अनेक कलाकारांचे मनोरंजनपर कार्यक्रम झाले.