
मुंबई : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात शिंदे, भाजप (BJP) यांचे सरकार आले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अद्याप या सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार बाकी आहे. मात्र या सरकारकडून निर्णयाचा धडाक सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. जुन्या सरकारच्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यासोबतच काही नवीन निर्णय देखील घेतले जात आहेत. राज्य सरकारच्या सहकार विभागाने आता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. अतिवृष्टीचे कारण देत निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच भाजपाने निवडणुका पुढे ढकल्याची टीका होत आहे.
सहकार विभागाच्या या निर्णयामुळे ज्या संस्थांचा कार्यकाळ संपला होता, अशा नामनिर्देशन सुरू झालेल्या व कार्यकाळ संपला आहे मात्र नामनिर्देश सुरू न झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात सहकारी संस्थांची एकूण संख्या 32 हजार 743 इतकी आहे. त्यापैकी 7620 सहकारी संस्थांनी निवडणुकांची तयारी सुरू केली होती. मात्र आता राज्य सहकार विभागाच्या या निर्णयामुळे या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. सहकारी संस्थांचे जाळे हे ग्रामीण भागात पसरलेले आहे. सध्या राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे अशा स्थितीत निवडणुका घेता येणे शक्य नसल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.
दरम्यान यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अनेक सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. अशा स्थितीमध्ये निवडणुका पुढे ढकलने हे लोकशाही विरोधी असल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे.