लोकसभेला भाजपचा प्रचार, तरीही जयकुमार गोरे काँग्रेसच्या प्रतोदपदी!

| Updated on: Jun 14, 2019 | 2:50 PM

राजकारणात सर्वकाही सदासर्वकाळ नसते याची प्रचिती सातत्याने येत असते. आज एकमेकांचे समर्थक असणारे उद्या कट्टर विरोधक होतात, तर आज विरोधक असणारे उद्या कट्टर समर्थक असतात.

लोकसभेला भाजपचा प्रचार, तरीही जयकुमार गोरे काँग्रेसच्या प्रतोदपदी!
Follow us on

मुंबई :  राजकारणात सर्वकाही सदासर्वकाळ नसते याची प्रचिती सातत्याने येत असते. आज एकमेकांचे समर्थक असणारे उद्या कट्टर विरोधक होतात, तर आज विरोधक असणारे उद्या कट्टर समर्थक असतात. तसाच प्रकार पुन्हा एकदा दिसून येत आहे. काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे.

ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड उघड प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला निवडूनही आणले, त्याच आमदार गोरे यांची काँग्रेसने विधीमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे.

वाचा : वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदी जवळपास निश्चित, थोरातांनाही मोठी संधी

जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देण्याची जाहीर भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही करण्याची तयारी काँग्रेसने केली होती.  मात्र आता जयकुमार गोरे यांना काँग्रेसने प्रतोदपद दिलं आहे. त्यावरुन राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.

गोरेंची राष्ट्रवादीविरोधी भूमिका

लोकसभा निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीच्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला  होता. “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीन दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल.” असं आमदार जयकुमार गोरे म्हटले होते.

राधाकृष्ण विखेंची जवळीक

काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केलाच, मात्र ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही जवळ होते. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे अनेक आमदार फोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यामध्ये जयकुमार गोरे यांचंही नाव होतं. विखे – गोरे हे अनेक ठिकाणी एकत्रही पाहायला मिळाले होते.

कोण आहेत जयकुमार गोरे?

  • जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेसचे आमदार आहेत.
  • 2009 आणि 2014 असे दोन वेळा ते या मतदारसंघात निवडून आले आहेत.
  • 2009 मध्ये अपक्ष तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली.
  • माण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जयकुमार गोरेंची भूमिका यंदा महत्त्वाची ठरली
  • काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी माण मध्ये जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही

संबंधित बातम्या 

राधाकृष्ण विखेंच्या गाडीत जयकुमार गोरे, थेट भाजपात जाणार?  

लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात… 

रामराजे लाचार, ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय : रणजितसिंह  

विखेंकडून आमदारकीचा राजीनामा, आता काँग्रेसला खिंडार पाडून बाहेर पडणार