विखेंकडून आमदारकीचा राजीनामा, आता काँग्रेसला खिंडार पाडून बाहेर पडणार

"काँग्रेसमध्ये घुसमट झाली, त्यामुळे आज आमदारकीचा राजीनामा दिला"

विखेंकडून आमदारकीचा राजीनामा, आता काँग्रेसला खिंडार पाडून बाहेर पडणार

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसकडून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र, मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लोकसभेचं तिकीट न दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज होते. गेल्या अनेक दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हालचाली वाढल्या होत्या. अखेर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विखे पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये घुसमट झाली, त्यामुळे आज आमदारकीचा राजीनामा दिला, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्याही तयारीत आहेत. विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसला खिंडार पाडून 10 ते 12 आमदारांना घेऊन भाजपममध्ये जातील, अशी माहिती काँग्रेसचे सिल्लोडचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.

विखे पाटलांसोबत भाजपमध्ये कोण कोण जाऊ शकतं?

  1. अब्दुल सत्तार
  2. भारत भालके
  3. जयकुमार गोरे
  4. नारायण पाटील
  5. सुनील केदार
  6. गोपाळदास अग्रवाल

काही वेळापूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर बंददाराआड काही नेत्यांसोबत चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेसचे आमदार भारत भालके, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. तसेच, भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही हजर होते.

कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?

राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे त्यांचे वडील. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले होते. 2009 पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते होते. अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *