लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात…

लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात...

सातारा : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे आणि आमदार कालिदास कोळंबकर या पाच नेत्यांची नावं आघाडीवर होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीरपणे मदत करणारे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनी विधानसभेदृष्टीने सावध पावित्रा घेतलाय. ”यंदा होणारी विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावरच लढवणार”, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरेंनी ‘टीव्ही 9 मराठी‘शी बोलताना दिली.

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील श्रमदानात सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना, ”मी पक्षांतर केलेलं नाही. मी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्येच राहणार”, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली. तसंच ”येत्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं. माढ्याचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना मी नव्हे तर जनतेने पाठिंबा दिला असेही त्यांनी यावेळी सांगितलं”.

नेमकं प्रकरण काय ?

लोकसभा निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीच्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला  होता. “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीन दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल.” असं आमदार जयकुमार गोरे म्हटले होते.

या प्रकरणानतंर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत पक्षात राहून विरोधी पक्षांना मदत करणाऱ्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेसने कारवाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही.

संबंधित बातम्या :

सोलापूर, माढ्यात भाजपची ताकद आणखी वाढली, काँग्रेस नेत्याचा भाजपप्रवेश

माढ्यात आघाडीला दणका, काँग्रेस आमदाराचा भावासह भाजपला पाठिंबा

विखेंसह पाच आमदारांवर कारवाईसाठी काँग्रेस निकालाची वाट पाहणार

Published On - 1:15 pm, Sun, 12 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI