काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर

| Updated on: Jul 14, 2020 | 1:11 PM

जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या माजी मंत्र्याची पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर
Follow us on

सांगली : काँग्रेस नेत्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. जयश्री पाटील या माजी मंत्री दिवंगत मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते. (Congress Leader in Sangali Jayshree Madan Patil likely to join NCP)

जयश्री पाटील यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरुन हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सांगली महापालिका, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेमध्येही राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत.

सांगली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मंत्री विश्वजित पतंगराव कदम आणि युवा नेते विशाल प्रकाशबापू पाटील असे दोन गट आहेत. प्रत्येक निवडणुकीत हे दोन गट कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने परस्परविरोधी काम करतात, असे म्हटले जाते.

दुसरीकडे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. पृथ्वीराज पाटील यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं पाठबळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मदनभाऊ पाटील गट अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. भाजपसारख्या अन्य पक्षांकडे हे कार्यकर्ते जाण्याअगोदर त्यांना राष्ट्रवादीत घेऊन मोठी राजकीय खेळी राष्ट्रवादी करत असल्याचंही बोललं जातं आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या अंतिम निर्णयासाठी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. लवकरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते. (Congress Leader in Sangali Jayshree Madan Patil likely to join NCP)

काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या पश्चात शहरात काँग्रेसला बळ देण्याचे काम जयश्री पाटील यांनी केले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसह पक्षाच्या विविध पातळीवर कार्यक्रम, आंदोलनात त्या सहभागी असतात.

हेही वाचा : “43 वर्ष राजकुमारीसारखी राहिले, पण…” माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास

गेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्थापनेपासून ते निवडणूक प्रचारातही त्यांनी आघाडी सांभाळली होती. परंतु, त्या तुलनेत काँग्रेसमधून त्यांना व कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही, अशी खदखद त्यांच्या मनात होती.

कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरुन बळ न दिल्याने विकासकामे होत नसल्याचीही खंत व्यक्त होत आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांतून राष्ट्रवादी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आग्रह सुरु आहे. याबाबत अनेक वेळा चर्चाही झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरु होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे समजते. (Congress Leader in Sangali Jayshree Madan Patil likely to join NCP)