…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील, गडाखांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा

| Updated on: Jan 12, 2020 | 9:37 PM

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जर नीट वागले नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील, असा इशारा अहमदनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला.

...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील, गडाखांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा
Follow us on

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जर नीट वागले नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कधीही राजीनामा देतील, असा इशारा अहमदनगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दिला (Yashwantrao Gadakh Advise to NCP-Congress). शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार किती दिवस चालणार? हा सवाल करत विरोधीपक्ष सरकारवर रोज टीकास्त्र सोडत असते. मात्र, आता यावर काँग्रेसच्याच यशवंतराव गडाखांनी सरकारला सल्ला वजा इशारा दिला आहे. “आपआपसांतील भांडणं थांबवून नीट वागा, नाही तर उद्धव ठाकरेच राजीनामा देतील”, असं वक्तव्य गडाखांनी केलं (Yashwantrao Gadakh Advise to NCP-Congress).

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपआपसांतील भांडणं थांबवून नीट वागा, नाही तर उद्धव ठाकरेच राजीनामा देतील. उद्धव ठाकरे हे राजकारणी माणूस नाही, मी त्यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो. उद्धव ठाकरे हे कलावंत कलाकार माणूस आहे, शब्द पाळणारा माणूस आहे, म्हणून मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य द्यायचं असेल, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भांडण कमी करावे. उद्धव ठाकरे यांचे आभार मानावे नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर हवा फूकत बसले असते. सत्तेत आले, शहाणपणाने वागावे ग्रामीण भागातील सरकार आलेलं आहे. शहरी भागातील सरकार गेलेलं आहे. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवायचे असेल, तर कशाला तुम्हाला बंगले पाहिजेत? कशाला तुम्हाला कार्यालय कशाला थाटामाटाचे पाहिजे?”, असा प्रश्न यशवंतराव गडाख यांनी विचारला.

नेवासा तालुक्याचे आमदार महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री चंद्रशेखर घुले यांचा नागरिक सत्कार समारंभ नेवासा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशवंतराव गडाख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्धव ठकरेंवर तीन पक्षाचं सरकार चालवण्याची जबाबदारी

आधी खात्यांच्या संख्येवरुन, नंतर खातेवाटपावरुन आणि बंगल्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाटप केलेले बंगलेही बदलवावे लागले. इतकंच नाही, तर स्वत:कडील महत्वाची खातीही राष्ट्रवादीला द्यावी लागली. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मानापमान नाट्य थांबताना दिसत नाही. यावरुनच गडाखांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कान टोचले. दुसरीकडे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही महाविकास आघाडीच्या सरकारवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाहीत. तीन पक्षांचं सरकार असल्यानं, सरकार चालवण्याचं आव्हान आहे, हे तर उद्धव ठाकरेंनीही मान्य केलं आहे. त्यामुळे आता हे तीन पक्षीय सरकार गडाखांचा सल्ला मानतात, की खरंच उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची वेळ येते, हे तर काळच ठरवेल.

Yashwantrao Gadakh advise to Congress and NCP