आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस

| Updated on: Jun 18, 2020 | 4:49 PM

आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता" असं बाळासाहेब थोरात म्हणाले. (Congress Minister Balasaheb Thorat Ashok Chavan meets CM Uddhav Thackeray)

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस
Follow us on

मुंबई : काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बैठकीला ‘मातोश्री’वर आले होते. आमची काही नाराजी नाही, सकारात्मक चर्चा झाली असून वादाचा काही विषय नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले. बैठकीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊतही ‘मातोश्री’वर आले होते. (Congress Minister Balasaheb Thorat Ashok Chavan meets CM Uddhav Thackeray)

“मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केलं जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या प्रमाणात मंत्री झाले. पण पुढचे वाटप समसमानच ठरलं होतं. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याचा वैयक्तिक विषय नाही” असं थोरातांनी सांगितलं.

‘न्याय्य योजना’ काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांनी देशासाठी मांडली आहे. पण गरीब माणसाला काही मदत करता येते का हे पाहायला हवं, असंही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

जवळपास गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती. आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचं आहे. आमचे प्रश्न हे जनतेशी निगडित आहेत, असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा : शिवसेना खासदार अनिल देसाई थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?

बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा वाढता नाराजीचा सूर लक्षात घेऊन अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली. (Congress Minister Balasaheb Thorat Ashok Chavan meets CM Uddhav Thackeray)