राहुल गांधींचा विश्वासू मोहरा राज्यसभेवर, महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित

| Updated on: Mar 12, 2020 | 12:14 PM

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav

राहुल गांधींचा विश्वासू मोहरा राज्यसभेवर, महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्रातील जागेवरुन राज्यसभेवर कोण जाणार, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या उमेदवारीविषयी काँग्रेसकडून अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. (Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav)

45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला होता. सातव यांच्या रुपाने संसदेच्या वरच्या सभागृहात काँग्रेसचा आवाज पुन्हा कणखर होताना दिसेल.

राष्ट्रवादी-काँग्रेसचा तिढा सुटला

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतील चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान ‘वेट अँड वॉच’वर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने फौजिया खानही आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. (Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav)

भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर भाजपच्या कोट्यातून रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेही आज राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेतही राज्यसभा उमेदवारीसाठी तिरंगी चुरस पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची नावं चर्चेत आहेत. परंतु माजी मंत्री दिवाकर रावते राज्यसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या (शुक्रवार 13 मार्च) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे. (Congress Rajyasabha Candidate Rajiv Satav)