सरकार येताच तिहेरी तलाक रद्द करु : काँग्रेस

सरकार येताच तिहेरी तलाक रद्द करु : काँग्रेस

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुका जवळ येताच विविध पक्षांकडून आश्वासनांची खैरात सुरु झाली आहे. काँग्रेसने देशभरात गाजत असलेल्या तिहेरी तलाकबाबत मोठी घोषणा केली. सरकार सत्तेत येताच तिहेरी तलाक कायदा रद्द करु, अशी घोषणा काँग्रेसने केली. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुष्मिता देव यांनी ही घोषणा केली.

“तिहेरी तलाक कायदा हे मोदी सरकारचं हत्यार आहे, ते वापरुन सरकार मुस्लिम पुरुषांना जेलमध्ये टाकू इच्छित आहे. मुस्लिम महिलांचा या कायद्याला विरोध आहे. काँग्रेसही या कायद्याला विरोध करत आहे. हा कायदा महिलांचं सशक्तीकरण नव्हे तर मुस्लिम महिला आणि मुस्लिम पुरुषांमध्ये भेदभाव करतो” असं सुष्मिता देव म्हणाल्या. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये काँग्रेसने अल्पसंख्यांक मोर्चा संमेलन आयोजित केलं होतं. यावेळी त्या बोलत होत्या.

सुष्मिता देव या आसाममधील सिल्चरच्या खासदार आहेत. मोदी सरकार सिटीझनशिप अर्थात नागरिकता देण्याच्या नावे आसामचे तुकडे करत आहे. जे कायदे संविधानविरोधी आहेत, अशा कायद्यांचं आम्ही समर्थन करणार नाही, असंही सुष्मिता देव म्हणाल्या.

राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल या संमेलनाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही संबोधित केलं. ते म्हणाले, “हा देश कोणत्याही एका जाती, धर्म, प्रदेश आणि भाषेचा नाही. हा देश हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीचा आहे. आमच्या अल्पसंख्यांकांनी प्रत्येक पावलागणिक देशाच्या प्रगतीसाठी काम केलं. पाच वर्षांपूर्वी म्हटलं जात होतं, नरेंद्र मोदीजींची छाती 56 इंच आहे, 15 वर्ष राज करतील. मात्र आज काँग्रेसने मोदींच्या लोकप्रियतेच्या चिंधड्या उडवल्या”

तुम्ही जर पंतप्रधान मोदींचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तर त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसेल. त्यांना माहित झालं आहे की देशाचे तुकडे करुन, द्वेष पसरवून देशावर राज करु शकत नाही, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

Published On - 5:27 pm, Thu, 7 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI