मोठी बातमी: अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक?

| Updated on: Jun 13, 2021 | 8:13 AM

कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. | Ram Shinde Ajit Pawar

मोठी बातमी: अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक?
अजित पवार आणि राम शिंदे
Follow us on

अहमदनगर: महाराष्ट्रातल्या प्रत्यक्ष आणि गुप्त भेटींचा सिलसिला आता नगर जिल्ह्यातही पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेते राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का? असा सवालही चर्चिला जातोय. दोन्ही नेत्यांनी भेटीबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही. त्यांच्या निकटवर्तीयांनाही याबाबत फार माहिती नसल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे राम शिंदे यांनी अशी कुठलीही भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे. (DCM Ajit Pawar meet BJP leader Ram Shinde says sources)

सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या घटना घडताना दिसत आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्यानिमित्ताने दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात नुकतीच मुंबईत झालेली भेटही चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे आता अजित पवार आणि राम शिंदे यांच्या भेटीमागेही काही राजकारण आहे का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोण आहेत राम शिंदे?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असलेले राम शिंदे हे भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये रोहित पवार यांचा विजय झाला होता.

राम शिंदे का भेटले असावेत?

राम शिंदे हे फडणवीसांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांचाच एखादा निरोप घेऊन तर राम शिंदे अजित पवारांना भेटले नाहीत ना? अशीही चर्चा सुरु आहे. राम शिंदे हे नगरच्या राजकारणात वेगळे पडल्याचं चित्र गेल्या काही काळात पहायला मिळतं आहे. त्यातच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपात मिळणारा मान, त्यानंतर राम शिंदेंच्या विरोधात विखेंनी उघडलेली आघाडी, त्यावरुन शिंदेंची भाजप नेतृत्वावरची नाराजी ह्या पार्श्वभूमीवरही शिंदे आणि अजित पवारांच्या भेटीला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. कर्जतमध्ये पराभव झाल्यानंतर राम शिंदे पक्षातही फार कुठे दिसत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर दबावाचं राजकारण करण्यासाठी तर अशा भेटीगाठी होत नाहीयत ना? असाही एक चर्चेचा सूर आहे.

 

संबंधित बातम्या:

पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझा पराभव झाला, राम शिंदेंची विखे पाटलांवर टीका

हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका, राम शिंदे यांचं टीकास्त्र

पक्षाच्या निर्णयाने समाधान, समितीच्या अहवालानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई : राम शिंदे

(DCM Ajit Pawar meet BJP leader Ram Shinde says sources)