Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला झटका, ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी भाजपा काँग्रेसला झटका देऊ शकते. काँग्रेसचा एक आमदार भाजपाच्या वाटेवर आहे. काल गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने या काँग्रेस आमदाराने भाजपा नेते, खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग होऊ शकतं.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला झटका, हा आमदार भाजपाच्या वाटेवर
bjp
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2024 | 10:32 AM

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग, आऊटगोईंग होऊ शकतं. अजून 2 ते 3 महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. राज्यात 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाड़ीचे उमेदवार विजयी झाले होते. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानाव लागलं होतं. लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीसाठी एक इशारा आहे. महायुतीने विधानसभेची तयारी करताना काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हा याच रणनितीचा एक भाग आहे. त्याशिवाय अनेक कल्याणकारी योजनांचा धडका लावला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपात प्रवेश करु शकतात. भाजप नेते उपाध्याय यांच्या भेटीनंतर आमदार अंतापुरकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. काल गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. आमदार अंतापुरकर भाजपात प्रवेश करणार असल्याची नांदेड जिल्ह्यात चर्चा आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात येतो. नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो.

भाजपाला त्याचा फायदा झाला नाही

लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवलय. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला फायदा झाला नाही. उलट फटका बसला. भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण निवडून आले. ऐन निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी केलेलं हे पक्षांतर नांदेडच्या मतदारांना पटलं नाही. त्यांनी तसा कौलही दिला. आमदार जितेश अंतापुरकर यांनी 2021 च्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत 1 लाखापेक्षा जास्त मत मिळवली. त्यांनी भाजपाच्या सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला.