
राज्यातल्या २९ महानगर पालिकांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे.राज्यात सर्वत्र आज नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज राज्यातील २९ महानगर पालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वत्र प्रचंड गर्दी होती. अनेक इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पक्षाकडून ए बी फॉर्म न मिळाल्याने रुसवे फुगवे पाहायला मिळाले. मात्र, मुंबईत १२ उमेदवारांनी वेळेच्या आत येऊनही अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज न स्विकारल्याने त्यांच्या निवडणूक लढण्याच्या हक्कावर पाणी सोडावे लागले आहे. या संदर्भात या १२ उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
राज्यात २९ महानगर पालिकांच्या निवडणूकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज ( ३० डिसेंबर ) शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वत्र निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. मुंबईत चौरंगी निवडूक होत आहेत. त्यामुळे सर्वत्र ए बी फॉर्म मिळालेले उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कोणत्याच पक्षाकडून संधी न मिळाल्याने अपक्षांची देखील अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. परंतू मुंबईतील काही उमेदवारांना ते कार्यालयात वेळेत येऊनही त्यांचे अर्ज न स्विकारता त्यांना बाहेरचा रस्ता दाखल्याने १२ उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.
या संदर्भात १२ उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र लिहून तक्रार केली आहे. आम्ही वेळेच्या आत येऊनही आमचे अर्ज स्विकारले न गेल्याची तक्रार त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. आम्ही वेळेच्या आत येऊन आम्हाला पैसे भरल्याची पावती मिळूनही कागदपत्रे घेतली जात नसल्याची तक्रार या उमेदवारांनी केली आहे. या १२ उमेदवारांनी तक्रार देऊन निवडणूक कार्यालयात ठिय्या मांडला.
निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात या १२ उमेदवारांनी आपली कैफियत मांडली आहे. त्यात ते म्हणतात की आज संध्याकाळी घडलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज स्वीकारले नाहीत ते आमच्या मते हेतुपुरस्सर केले आहे. आमचे अर्ज शुल्क संध्याकाळी ५ वाजण्याच्या अगदी आधी स्वीकारले गेले आणि शुल्क स्वीकारल्यानंतर आम्हाला रितसर पावत्याही देण्यात आल्या होत्या. सर्व उमेदवारांना कळवण्यात आले होते की छाननी रात्री उशिरापर्यंत होईल.
मात्र, सुरक्षेसाठी असलेल्या ५ जणांनी आम्हाला प्रवेश रोखला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राहुल नार्वेकर, जे उमेदवार नसतानाही, आरओ (रिटर्निंग ऑफिसर) यांच्या केबिनमध्ये उपस्थित होते. त्यांनी आम्हाला पोलिसांना सोबत घेऊन थांबवले.ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, कारण या भागातील आमचे कार्यकर्ते निवडणूक लढवित आहेत असे या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.