एकनाथ शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्ली वारी! आज परतल्यानंतर फडणवीस उद्या पुन्हा दिल्लीला जाणार, कारण काय?

आता उद्या आणि परवा पुन्हा एकदा फडणवीस दिल्ली (Delhi) दौऱ्यावर असणार आहेत. फडणवीसांच्या या दिल्लीवारीमागे केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' हे अभियान असल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्ली वारी! आज परतल्यानंतर फडणवीस उद्या पुन्हा दिल्लीला जाणार, कारण काय?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 4:55 PM

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सातत्याने राज्याच्या आणि दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. अशावेळी त्यांना काल थकवा जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे शिंदे यांचे सर्व राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. एकीकडे मुख्यमंत्री आजारी असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) मात्र दिल्लीवारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी दिल्लीला गेले आणि रात्री लगेच परतले. मात्र, आता उद्या आणि परवा पुन्हा एकदा फडणवीस दिल्ली (Delhi) दौऱ्यावर असणार आहेत. फडणवीसांच्या या दिल्लीवारीमागे केंद्र सरकारनं ‘हर घर तिरंगा’ हे अभियान असल्याचं सांगितलं जात आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी भाजपची बैठक

राज्यात शिंदे सरकार येऊन महिना लोटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. तसंच राज्यातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दिल्ली दौरे सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर होते. गुरुवारी रात्रीच ते महाराष्ट्रात परतले. त्यानंतर आता उद्या आणि परवा असे दोन दिवस फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला जाणार आहेत. ‘हर घर तिरंगा’ या केंद्र सरकारच्या अभियाना संदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक होत आहे. या बैठकीसाठी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच रविवारी होणाऱ्या ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमालाही ते हजेरी लावणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. दरम्यान, दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर असताना फडणवीस राज्यातील स्थिती आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंना आराम करण्याचा सल्ला

एकनाथ शिंदे यांची बंड केल्यापासून ते सत्ता स्थापन करेपर्यंत धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे राज्यात ठिकठिकाणी सत्कार झाले. त्यानिमित्ताने त्यांना फिरावं लागलं. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठीही त्यांनी गडचिरोलीचा दैरा केला. तसेच मंत्रालयात बैठकांवर बैठका घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावावे लागले. त्यानंतर त्यांना वारंवार दिल्लीतही जावं लागलं. विशेष म्हणजे रात्री अपरात्रीही त्यांनी दिल्लीत जावं लागलं. त्यामुळे झोप पुरेशी मिळू शकली नाही. ते होत नाही तोच त्यांनी राज्यात दौरे सुरू केले. या निमित्ताने त्या त्या जिल्ह्यातील पूर स्थितीचा आढावा घेतानाच राजकीय सभांनाही ते संबोधित करत होते. परिणामी त्यांची दगदग झाली. त्यामुळे त्यांना थकवा आला असावा असं सांगण्यात येतं.