
Ajit Pawar On Manikrao Kokate : पावसाळी अधिवेशन चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसले होते. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. दरम्यान, सभागृहात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असताना ऑनलाईन जुगार खेळणे चूक आहे, असे म्हणत विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मी त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल, अशी भूमिका घेतली होती. आता मात्र अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे माणिकराव कोकाटे यांना अभय मिळालं आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
अजित पवार यांनी माझी आणि कोकाटे यांची 28 किंवा 29 जुलै रोजी भेट होईल. या भेटीत सभागृहात घडलेला प्रकार नेमका काय आहे? याबाब मी त्यांना विचारेन. त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे याआधी अजित पवार यांनी सांगितले होते.
माणिकराव कोकाटे यांच्याकडून मागे अशीच गोष्ट घडून गेली होती. त्याची मी दखल घेत असं होता कामा नये, असे सांगितले होते. तशीच चूक दुसऱ्यांदा घडली. तेव्हाही मी त्यांना जाणीव करून दिली की दोन वेळा झालं आता तिसऱ्यांदा तशी वेळ येऊ देऊ नका, असं मी त्यांना सांगितलं होतं. आता नव्या प्रकरणात मी रमी खेळतच नव्हतो, असे कोकाटे सांगत आहेत. त्यामुळे त्याचा तपास होईल आणि लवकरच सत्य काय ते समोर येईल. मी सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटे यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करेन आणि नंतर निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी 24 जुलै रोजी सांगितले होते.
आता 27 जुलै रोजी मात्र अजित पवार यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी माध्यमांना सांगण्याचे काही कारण नाही. ज्यावेळी मी निर्णय घेईल तेव्हा तो जाहीर केला जाईल, असे अजित पवार म्हणाले. तसेच आमचे निर्णय काय व्हावेत हे राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू. तसेच मंत्रिमंडळात कोण असावं आणि कोण नसावं हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे, असे अजित पावर म्हणाले.
अजित पवार यांच्या याच विधानामुळे आता माणिकराव कोकाटे यांना अभय देण्यात आलंय की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी 27 जुलै रोजीच एका सभेत बोलताना मी चुकीचं समर्थन करत नाही. माझ्यापुढे कोणी चूक केली तर मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे. मी तीन वेळा समजून सांगेन पण चौथ्यांदा मी समजून सांगत नाही, असंही म्हटलंय. त्यामुळे कोकाटे यांच्याबाबतीत नेमकं काय होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.