Eknath Shinde : एकनाथ शिंदे गट राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचं पत्र पाठवणार, अजून 3 आमदार गुवाहाटीत दाखल!

| Updated on: Jun 23, 2022 | 6:05 PM

कृषीमंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड आणि रविंद्र फाटकही गुवाहाटीत पोहोचल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर उद्या एकनाथ शिंदे गटाकडून राज्यपाल महोदयांना आमदारांच्या सह्यांचं पत्र पाठवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गट राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचं पत्र पाठवणार, अजून 3 आमदार गुवाहाटीत दाखल!
टाकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे फसले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड शमणार की शिवसेना दुंभगली जाणार, या प्रश्नाचा उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या 41 वर पोहोचलीय. कारण, कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार संजय राठोड आणि रविंद्र फाटकही गुवाहाटीत पोहोचल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर उद्या एकनाथ शिंदे गटाकडून राज्यपाल (Governor) महोदयांना आमदारांच्या सह्यांचं पत्र पाठवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दुसरीकडे शिवसेनेकडून अद्यापही आमदारांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलं जात आहे.

अजून तीन आमदार शिंदे गटात सहभागी

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार हॉटेल रेडिसन्स ब्ल्यू मध्ये मुक्कामी आहेत. इथे असलेल्या आमदारांची संख्या 42 वर पोहोचली आहे. हॉटेलमधील आमदारांचा एक फोटोही समोर आलाय. त्यानंतर आता अजून तीन आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यात कृषीमंत्री दादा भुसे, माजी वनमंत्री संजय राठोड आणि सूरतला एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी गेलेले रविंद्र फाटक यांच्या समावेश आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडील आमदारांची संख्या आता 45 वर पोहोचल्याचं दिसत आहे.

राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचं पत्र पाठवणार

एकनाथ शिंदे गटाकडून आमदारांच्या सह्यांचं पत्र आज राज्यपालांना पाठवलं जाणार होतं. मात्र अजून काही आमदार सहभागी होणार असल्यामुळे आज पत्र पाठवण्यात आलं नाही. त्यानंतर आता उद्या सर्व आमदारांच्या सह्यांचं पत्र पाठवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

‘आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मगच चर्चा’

एकनाथ शिंदे यांनी आपली मागणी लावून धरल्यानंतर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक पाऊल मागे आले आहेत. शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची आमची तयारी आहे, असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र, संजय राऊतांच्या या आवाहनानंतर एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांकडून आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडा, मगच चर्चा, अशी ठामपणे सांगितल्याची माहिती मिळतेय.