Eknath Shinde: राजकीय घडामोडींना प्रचंड वेग, प्रधान यांचा राजीनामा होताच एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार; काहीतरी मोठं घडणार?
Eknath Shinde: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यात काही तरी मोठं घडणार असल्याचे म्हटले जात आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले. या तरुणांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजिनाम्यानंतर राज्यात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत.
एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार
एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन अमित शाह यांच्या भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. दोन वाजून वीस मिनिटांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी आली. त्यानंतर लगेच वीस मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली. अमित शाह यांचा फोन आल्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले.
त्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीत दिल्लीत घडत असलेल्या या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या असल्याचे म्हणावे लागणार आहे. आता अमित शाह यांच्या भेटीमध्ये काय होणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री फडणवीसांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “निश्चित पांडुरंगाचा आशिर्वाद आहे. पण मी या पदावर सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. तिसरा माझा क्रमांक आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. मला असं वाटतं की पदावर आपण किती काळ राहिलो, हे महत्वाचं नाही. आपण नेमकं त्या काळाचा नेमका उपयोग काय केला हे महत्वाचे आहे. मला विश्वास आहे कि पांडुरंगाच्या कृपेने अनेक चांगली काम माझ्या हातुन होतील”