Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या गटातून आमदार कैलास पाटील निसटले!, दुचाकी आणि ट्रकवर बसून गुजरात सीमेवरुन मुंबई गाठली!

| Updated on: Jun 21, 2022 | 10:55 PM

कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील शिंदे गटातून निसटण्यात यशस्वी ठरले आहेत. शिंदे यांच्यासोबत कैलास पाटील हे देखील गुजरातच्या दिशेनं निघाले होते. मात्र, त्यांना शंका आली आणि त्यांनी शिताफीने शिंदे आणि अन्य आमदारांपासून आपली सूटका केली आणि परत मुंबईत पोहोचले आहेत!

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या गटातून आमदार कैलास पाटील निसटले!, दुचाकी आणि ट्रकवर बसून गुजरात सीमेवरुन मुंबई गाठली!
कैलास पाटील, आमदार, शिवसेना
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात आणि विशेषत: शिवसेनेत (Shivsena) मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलंय. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोमवारी रात्रीच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसही सूरतला गेले. तिथे लि मेरेडियन हॉटेलमध्ये हे आमदार मुक्कामी आहेत. मात्र, कळंब-उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) शिंदे गटातून निसटण्यात यशस्वी ठरले आहेत. शिंदे यांच्यासोबत कैलास पाटील हे देखील गुजरातच्या दिशेनं निघाले होते. मात्र, त्यांना शंका आली आणि त्यांनी शिताफीने शिंदे आणि अन्य आमदारांपासून आपली सूटका केली आणि परत मुंबईत पोहोचले आहेत!

कैलास पाटील शिताफीनं निसटले, गुजरात सीमेवरुन मुंबईत परतले

कैलास शिंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणूक निकालानंतर तांना साहेबांनी जेवायला बोलावलं आहे असा निरोप मिळाला. त्यानंतर ते एका गाडीत बसून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन निघाले. सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर गेल्यावर त्यांना शंका आली. अजून पुढे गेल्यावर त्यांनी लघूशंकेचं कारण दिलं आणि ते गाडीतून उतरले. कैलास पाटील उतरले ते ठिकाण मुंबईपासून सुमारे शंभर ते दीडशे किमी अंतरावर होतं. अंधाराचा फायदा घेत सोबतच्या लोकांची नजर चुकवून कैलास पाटील तिथून निसटले. त्यांनी जवळपास चार ते पाच किलोमीटरची पायपीट केली. पुढे हायवेवर आल्यानंतर त्यांनी एका दुचारीस्वाराकडे लिफ्ट मागितली. तसंच पुढे त्यांनी एका ट्रकमधून प्रवास केला आणि दहिसर चेक नाक्यावर ते उतरले आणि मुंबईत पुन्हा शिवसेनेच्या गोटात सामिल झाले. कैलास पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांसोबत शिवसेनेच्या अन्य काही आमदारांना कशाप्रकारे गुजरातला नेण्यात आलं हे समजतंय.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसामला हलवण्यात येणार

एकीकडे खासदार संजय राऊत यांनी नियम पाळले नाहीत तर आमदारांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय. तसंच गुजरात महाराष्ट्राच्या सीमेला लागून असल्यानं आता बंडखोर आमदारांना थेट आसामच्या गुवाहाटीमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. त्यासाठी सूरत विमानतळावर खास चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली आहे. मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसामला नेण्याची दाट शक्यता आहे.