अमित शाहांना पत्र लिहून माजी मुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

इटानगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ईशान्य भारतात मोठा धक्का बसलाय. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी राजीनामा दिलाय. भाजप सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्त्वाचा भाजपला विसर पडलाय, असं पत्र त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय. पक्ष फक्त सत्ता […]

अमित शाहांना पत्र लिहून माजी मुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम
Follow us on

इटानगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ईशान्य भारतात मोठा धक्का बसलाय. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी राजीनामा दिलाय. भाजप सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्त्वाचा भाजपला विसर पडलाय, असं पत्र त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय.

पक्ष फक्त सत्ता मिळवण्याचं व्यासपीठ बनलंय. हा पक्ष एका अशा नेत्याच्या हातात आहे, जो विकेंद्रीकरण आणि लोकशाही पद्धतीने निर्णय प्रक्रियेचा विरोध करत होता. या मूल्यांना त्याने कधीही मानलं नाही, असंही अपांग यांनी पक्ष नेतृत्त्वाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

अरुणाचल प्रदेशात भाजपला 2014 मध्ये लोकांनी नाकारलं होतं. पण जनादेशाच्या विरोधात जाऊन भाजपने पैशांचा वापर केला आणि घोडेबाजार केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही भाजपने अरुणाचल प्रदेशात सत्ता स्थापन केली आणि दिवंगत कालिखो पुल यांना मुख्यमंत्री केलं, असा गंभीर आरोपही अपांग यांनी केलाय.

कालिखो यांच्या आत्महत्येची चौकशी न केल्याबद्दलही अपांग यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप नेतृत्त्वाने ईशान्य भारतातील इतर राज्यात सत्ता स्थापन करताना जी पद्धत वापरली, ती आवडली नसल्याचंही अपांग यांनी पत्रात म्हटलंय.

अपांग यांनी वाजपेयींची आठवत काढत भाजपवर ताशेरे ओढले आहेत. वाजपेयींनी नेहमी एकतेवर विश्वास ठेवला आणि राजधर्म शिकवला. ते एक महान नेते होते. आज त्यांनी शिकवलेल्या राजधर्माचंच पालन करतोय, असं म्हणत अपांग यांनी राजीनामा दिला.

गेगांग अपांग सात वेळा आमदार आणि 23 वर्ष अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या केवळ दोन जागा असल्या तरी एकूण ईशान्य भारताचा विचार करता हा मोठा धक्का आहे. हे पत्र तुमच्या माहितीसाठी लिहित आहे आणि यावर काहीतरी कार्यवाही कराल अशी अपेक्षा ठेवतो, असंही अपांग यांनी म्हटलंय.