शेतकरी आत्महत्येप्रकरणी शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकरांवर गुन्हा दाखल

| Updated on: Sep 15, 2019 | 9:51 PM

शिवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यासह अन्य 5 जणांवर फसवणुकीचा आणि शेतकऱ्याला आत्महत्येस (Farmer Suicide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी आत्महत्येप्रकरणी शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकरांवर गुन्हा दाखल
Follow us on

उस्मानाबाद : शिवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यासह अन्य 5 जणांवर फसवणुकीचा आणि शेतकऱ्याला आत्महत्येस (Farmer Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याने 12 एप्रिल 2019 रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कारखाना सुरु करण्यासाठी 2010 रोजी कर्ज घेतले होते. मात्र कर्ज परत फेडू न शकल्यामुळे बँकेने त्यांची जमीन लिलावासाठी काढली. त्यामुळे तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तब्बल 5 महिने तपास केल्यानंतर ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्या केल्यावर ढवळे यांच्या खिशात दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस ओम राजे निंबाळकर आणि वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. तर दुसऱ्या चिठ्ठीत 13 शेतकऱ्यांनी तेरणा कारखान्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र भेट झाली नाही, असं त्यात म्हटलं होते. त्यासोबतच शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार ओम राजे यांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, शेतकरी ढवळे यांच्या आत्महत्येचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत: त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.