Maharashtra Legislative Council: विधानपरिषदेसाठी भाजप पाचवा उमेदवार देणार?, आघाडीला विधानपरिषद निवडणुकीतही डोकेदुखी

| Updated on: Jun 02, 2022 | 1:04 PM

Maharashtra Legislative Council: विधान परिषदेसाठी 9 जूनपर्यंत अर्ज भरायचे आहेत. तर राज्यसभेसाठी 10 जून रोजी निवडणुका होत आहेत. या दरम्यान राज्यसभेसाठी भाजपकडून अपक्षांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Maharashtra Legislative Council: विधानपरिषदेसाठी भाजप पाचवा उमेदवार देणार?, आघाडीला विधानपरिषद निवडणुकीतही डोकेदुखी
विधानपरिषदेसाठी भाजप पाचवा उमेदवार देणार?, आघाडीला विधानपरिषद निवडणुकीतही डोकेदुखी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election) भाजपने (BJP) सातवा उमेदवार देऊन महाविकास आघाडी सरकारचं टेन्शन वाढवलेलं असतानाच आता विधान परिषद निवडणुकीतही (Maharashtra Legislative Council) आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे. विधान परिषदेची पाचवी जागा भाजप लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीने चौथा उमेदवार मागे घेतला तर भाजप विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे विधान परिषदेत महाविकास आघाडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. संख्याबळानुसार विधान परिषदेत भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. पण राज्यसभेसाठी निवडणूक झाली तर मात्र भाजप विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवारही देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, संजय दौंड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, रामनिवास सिंग आणि दिवाकर रावते या दहा सदस्यांचा 22 जुलै रोजी कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विधानपरिषदेत कुणाला संधी दिली जाते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजपमध्ये पाचवा उमेदवार देणार असल्याचं घटत असल्याने भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

विधानपरिषद निवडणुकीसाठी आजच अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर सर्व उमेदवारांना 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्यासाठी 13 जूनची मुदत असेल. 20 जून रोजी मतदान पार पडेल. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. 20 जून रोजी सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होईल. त्यावेळी विधान परिषदेचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

राज्यसभेचा विधान परिषदेवर परिणाम

विधान परिषदेसाठी 9 जूनपर्यंत अर्ज भरायचे आहेत. तर राज्यसभेसाठी 10 जून रोजी निवडणुका होत आहेत. या दरम्यान राज्यसभेसाठी भाजपकडून अपक्षांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष भाजपच्या गळाला लागल्यास त्याचा विधान परिषदेच्या निवडणुकीवर थेट परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.