जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना 10 दिवस जेलमध्ये राहावं लागणार? वकिलांनी सांगितलं!

| Updated on: Dec 12, 2022 | 1:37 PM

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कोर्टात सांगितलं.

जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांना 10 दिवस जेलमध्ये राहावं लागणार? वकिलांनी सांगितलं!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआय (CBI) प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. भ्रष्टाचार आणि वसुलीच्या आरोपांचा सीबीआयतर्फे तपास सुरु आहे. या केसमध्ये आज जामीन मंजूर झाला असला तरीही पुढील 10 दिवस त्यांना जेलमधून बाहेर निघता येणार नाही. कारण जामीन मिळाल्यानंतर 10 मिनिटातच या आदेशावर कोर्टाने स्थगिती दिली, अशी माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली.

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कोर्टात सांगितलं. त्यासाठी जामीनाच्या अर्जावर 10 दिवसांची स्थगिती मिळावी, अशी मागणी सीबीआयने केली.

उच्च न्यायालयाने हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे जामीन मिळाला असला तरीही अनिल देशमुख यांची पुढील 10 दिवस तुरुंगातून मुक्तता होणार नाही, अशी माहिती वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली.

अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या घोटाळ्यात जामीन मंजूर करतानाच कोर्टाने या केसमध्ये कुठेही तथ्य दिसत नाही, असं म्हटलंय. काही अटी शर्थींच्या आधारे अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आलाय.  1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाल्याची माहिती वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सध्या ते जेलमध्ये आहेत. सुप्रीम कोर्टाने सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर जामीनाचा आदेश कायम ठेवल्यास अनिल देशमुख यांना जेलमधून तत्काळ मुक्त करण्यात येईल, अशी माहिती वकिलांनी दिली.