भाजपला झटक्यावर झटके! अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

| Updated on: Feb 06, 2021 | 8:03 PM

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलंय.

भाजपला झटक्यावर झटके! अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
Follow us on

मुंबई : महापालिका निवडणुकीचं वारं वाहत असताना आता शिवसेनेनं भाजपला अजून एक झटका दिला आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांत शिवसेनेनं भाजपला दुसरा मोठा झटका दिल्याचं पाहायला मिळत आहे.(Former MLA and BJP leader Hemendra Mehta joins Shiv Sena)

हेमेंद्र मेहता यांचा प्रवेश हा शिवसेनेच्या फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिममधून 3 वेळा आमदार होते. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना विधानसभेला तिकीट देण्यात आलं. त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. पुढे मेहता यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपवासी झाले आणि आज अखेर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्याच्या मोहिमेत मेहता यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेनं त्यांना प्रवेश दिल्याचं बोललं जात आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

कृष्णा हेगडेंचाही भाजप प्रवेश

माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलाय. कृष्णा हेगडे हे गेल्या काही काळापासून भाजपमध्ये होते. पण तिथे ते अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेते प्रवेश केलाय. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची मागणी केली होती. रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचं हेगडे यांनी सांगितल्यानंतर ते चर्चेत आले होते.(BJP leader Krishna Hegde joins Shiv Sena)

कृष्णा हेगडे हे मुळचे काँग्रेसचे होते. त्यांनी मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूकही जिंकली होती. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे. पराग अळवणी हे भाजपचे तिथले आमदार आहेत. विलेपार्लेमध्ये कृष्णा हेगडे यांना वाव मिळत नव्हता आणि ते गेल्या काही काळापासून अस्वस्थ असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे ते भाजपला राम राम ठोकतील अशी शक्यताही वर्तवली जात होती. शुक्रवारी अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं आहे.

संबंधित बातम्या :

कृष्णा हेगडे यांचा भाजपला रामराम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शिवबंधन’ बांधलं

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

Former MLA and BJP leader Hemendra Mehta joins Shiv Sena