हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ नेमा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Sep 04, 2021 | 10:34 AM

हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती' शोधण्यासाठी 'टास्क फोर्स'ची (Task Force)  स्थापना करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसींना डावलण्यात आल्याचा आरोप पडळकर यांनी आपल्या पत्रात केला आहे.

हरवलेली ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्स नेमा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
उद्धव ठाकरे आणि गोपीचंद पडळकर
Follow us on

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) पत्र पाठवलं आहे. हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची (Task Force)  स्थापना करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसींना डावलण्यात आल्याचा आरोप पडळकर यांनी आपल्या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असा हल्लाही पडळकरांनी चढवला.

गोपीचंद पडळकरांचं पत्र जसंच्या तसं

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी ,भटके विमुक्त यांच्या हक्क-अधिकारांना कायम डावलण्यात आलंय, पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आलाय. हे शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये, MPSC च्या उत्तीर्ण मागासवर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये, ओबीसींच्या राजकीय आरक्षणबाबत न्यायालयात बाजू मांडतानाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी मुद्दामहून ‘सेन्सेस डेटा आणि इंपेरिकल डेटा’ यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये, अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आलंय.

महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसींविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या आरक्षणा संबंधी, शासकीय लाभ व सवलती संदर्भात आणि ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांचा समग्र अभ्यास करून मंत्रीमंडळाला शिफारस करण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीला आता वर्ष होत आलं आहे. बरं या समितीमध्ये कुणी साधी सुधी मंडळी नव्हती. ओबीसींसाठी मोठ्या वल्गना करणारे,ओबीसींवरील प्रेम दाखवत आणाभाका घेणारे आणि प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले महाविकास आघाडी सरकारमधील ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांचा फौज फाटा या उपसमितीमध्ये होता.

या समितीचे अध्यक्ष आहेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब आणि सदस्य तर आणखीनच ‘दिग्गज’ ओबीसी नेते आहेत, ज्यात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी वनमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील. अशा दिग्गजांची मांदीयाळी या समितीत असताना यांनी वर्षभरात ओबीसी प्रश्नांवर नेमका कोणता अभ्यास करून अहवाल सादर केलाय, हे कळायला मार्ग नाही. म्हणूनच सामान्य ओबीसी जनतेला ही फक्त ‘दिग्गज’ ओबीसी नेत्यांची ‘मांदीयाळी’ नसून ही ‘निष्क्रीय दिग्गजांची उपसमिती’ आहे, असे वाटायला लागले आहे. ही उपसमिती गेल्या वर्षभरापासून स्थापन झाली आणि स्थापन होताच ‘अदृश्यही’ झाली.

आता ही अदृश्य व हरवलेली उपसमिती नेमकी कुठे हरवली आहे? हीला शोधण्यासाठी आपण नव्याने एखाद्या ‘टास्क फोर्स’ची स्थापना कराल का मुख्यमंत्री महोदय? तसे जर शक्य नसेल तर राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ओबीसी जनतेकडून ‘ही उपसमिती हरवली आहे’, अशी आम्ही तक्रार दाखल करू. जेणेकरून नेहमीच ‘कार्यतत्पर’ असलेली पोलिस यंत्राणा या समितीचा शोध घेईल. अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रात केली आहे.

संबंधित बातम्या  

बिरोबाच्या खोट्या शपथा घेणाऱ्याचं वाटोळं होतं, नाव न घेता जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल

हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? : गोपीचंद पडळकर