निवडणुकीत विरोधकांसोबतही युती करा, पण… गुलाबराव पाटलांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
Gulabrao patil : जळगावमध्ये आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील वादावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी निवडणुकीबाबतही त्यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.

किशोर पाटील, जळगाव, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : गाव पातळीवर पक्षापेक्षा गावातली भावकी आणि जातीय समीकरणावर ही निवडणूक होत असते. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन गावाचा विकास करायचा असेल, तर जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध काढा. सर्व विचारांच्या लोकांना गावाच्या विकासासाठी एकत्रित घ्या; मात्र हे होत असताना जास्तीत जास्त शिवसेनेचे सरपंच कसे होतील, याकडे लक्ष द्या, अशा सूचना मी दिलेल्या आहेत.
प्रतापराव पाटील जिल्हा बँक निवडणूक माघार का घेतली?
प्रताप पाटील यांच्या माघारीनंतर निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये रोष होता, पण शेवटी वाटाघाटीमध्ये जे ठरतं ते मान्य करावं लागतं आणि ते त्यांनी मान्य केलं. मी त्यांची समजूत काढण्याचा १०० टक्के प्रयत्न केला आहे. वेळ येईल तेव्हा संधी मिळेल, पण थोडं थांबावं लागणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे.
आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटलांनी आमदार मंगेश चव्हाणांना दिलेले आव्हान
मी दोघांचीही समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल. आजही मी बोललो आहे की संयम ठेवा. शेवटी आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक हेच एकमेव उद्दिष्ट नाहीये. केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, येणाऱ्या झेडपीच्या निवडणुका आहेत. याचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर होऊ नये, यासाठी संयम पाळला पाहिजे.
निश्चितपणे असं व्हायला नको होतं, पण आता ठीक आहे. आम्ही सुमितची समजूत काढू आणि मंगेश दादांचीही समजूत काढू. जितकं जोडता येईल तेवढं जोडण्याचा मी मागेही प्रयत्न केला होता आणि पुन्हा करण्याचा प्रयत्न करेन, असं गुलाबराव पाटील सुमित पाटलांनी आमदार मंगेश चव्हाणांबद्दल बोलताना काही अपशब्दांचा वापर केल्या प्रकरणी बोलत होते.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी मेळाव्यातून सुमित पाटील व्यासपीठावरून उठून गेले त्यावरही भाष्य केलं ते म्हणाले की, मला ते जाताना आपण पाहिलं असेल की ते माझ्या पाया पडून गेले आणि त्यांनी सांगितलं की मला पुढे काम आहे. मी म्हटलं ठीक आहे, काही काम असेल तर जा; पण पुढे असा काही विषय होईल हे मला माहीत नव्हतं.