
Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते कथितरित्या ऑनलाईन रमी गेम खेळत होते. तसा दावा विरोधकांकडून केला जातोय. तर मी गेम खेळत नव्हतो तर जाहिरात स्कीप करत होतो, असा दावा कोकाटे यांनी केलाय. दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. संपूर्ण राज्यातील शेतकरी संकटात असताना कृषिमंत्री विधिमंडळात ऑनलाईन जुगार खेळत होते, अस म्हणत विरोधक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र कोकाटे यांची पाठराखण केली आहे. माणिकराव कोकाटे हे मनाने चांगले, प्रेमळ आणि स्पष्टवक्ता असलेली व्यक्ती आहेत, असं मुश्रीफ यांनी म्हटलंय.
हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर भाष्य केले. यापूर्वीदेखील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केली होती. त्यावेळी अजितदादा पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की बळीराजा हा आपला दैवत आहे. त्यामुळे अशा पद्धतीची भाषा करू नये, असे अजित पवार यांनी त्यांना सूचना केल्या होत्या.
आता मी माणिकराव कोकाटे विधिमंडळामध्ये मोबाईलवर काहीतरी करत असल्याचे पाहिले. लहान मुलं मोबाईलवर असं काहीतरी करत असतात हे मी पाहिलेले आहे. कोकाटे साहेब हे रमी खेळत असल्याचा दावा केला जातोय म्हणजे ते कुठे क्लबमध्ये जाऊन बसलेत आणि रमी खेळत आहेत की काय? असं वाटलं होतं, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
तसेच, माणिकराव कोकाटे हे मनाने चांगली, प्रेमळ आणि स्पष्टवक्ता असलेली व्यक्ती आहेत, असं म्हणत त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. रोहित पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेण्याची फार घाई झाली आहे. मी बातम्यांत वाचलंय की रोहित पवार यांच्या दबावामुळेच जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, असा दावा त्यांनी केलाय. आता रोहित पवार यांनी त्यांच्या आत्या आणि आमच्या आधीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मतभेद करू नये एवढीच अपेक्षा आहे, असा टोलाही मुश्रीफ यांनी रोहित पवारांना लगावलाय.
दरम्यान, मी रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्कीप करत होतो, असा दावा कोकाटे यांनी केलाय. या दाव्यानंतर आता शरद पवार यांच्या गटाचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांचे काही नवे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच कोकाटे हे ऑनलाईन जुगारच खेळत होते, याचे आणखी पुरावे हवे असतील तर तेही देतो असे खुले आव्हानच आव्हाड यांनी दिले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.