हिमाचलमध्ये राजकीय हालचालींना वेग, भाजपने पाच बड्या नेत्यांना पक्षाबाहेर काढलं
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिमला : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं असताना हिमाचल प्रदेशातूनही एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर तीन महिने झाले असले तरी मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. या दरम्यान महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप करत विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. पण फक्त महाराष्ट्रच नाही तर हिमाचल प्रदेशातील देखील राजकीय वातारवरण चांगलंच तापलं आहे. अर्थात त्यामागील कारणं वेगवेगळी आहेत. पण हिमाचलमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. हिमाचलमध्ये भाजपने पाच बड्या नेत्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हिमाचलमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बंडखोरी करणाऱ्या पाच बड्या नेत्यांविरोधात भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने या पाचही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. यामध्ये प्रदेश उपाध्यक्षाचादेखील समावेश आहे. तर चार माजी आमदारांचा समावेश आहे. भाजपने या पाचही नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेर काढलं आह. या सर्व नेत्यांनी निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरलाय.
भाजपने ही कारवाई तडकाफडकी केली नाही. त्याआधी भाजपकडून या पाचही बंडखोर नेत्यांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला. पण तरीही ते ऐकण्याच्या मनस्थित नसल्याने भाजपला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये किन्नोरचे माजी आमदार तेजवंत सिंह, इंदौराचे माजी आमदार मनोहर धीमान, आनीचे माजी आमदार किशोरी लाल, नालागढचे माजी आमदार केएल ठाकुर आमि फतेपूरच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरणारे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कृणाल परमार यांचा समावेश आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यापासून ते गृहमूंत्री अमित शाह, मुख्यमंत्री जयकुमार ठाकुर यांनी सर्व बंडखोर नेत्यांची समजूत काढण्याचे बरेच प्रयत्न केले होते. पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. खरंतर ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते नाराज झाले. या नेत्यांना अर्ज मागे घेतला नाही म्हणून अखेर पक्षाने सर्वांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला. सर्वांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे.
भाजपच्या या कारवाईआधी काँग्रेसनेदेखील अशाचप्रकारची कारवाई केली होती. काँग्रेसने सहा नेत्यांवर निलंबनाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला होता. यामध्ये गाज गिरी, जगजीवन पाल, गंगू राम मुसाफिर, डॉ. सुभाष मंगलेट, सुशील कौल, विजय पाल या नेत्यांचा समावेश होता.