
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री जवाहर चावडा यांनी आता भाजपमध्येच उघडपणे बंडखोरी केली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या जवाहर चावडा यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी भाजपचे निवडणूक चिन्ह काढून टाकले आहे. आपली ओळख भाजपमुळे नाही तर स्वतःची स्वतान्र ओळख आहे असे त्यांनी म्हटले आहे. मनसुख मांडविया यांनी जे काही वक्तव्य केले ते त्यांनी निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीदरम्यान दिलेले असावे, असेही जवाहर चावडा म्हणाले.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ‘असे अनेक नेते आहेत जे स्वतःला खूप मोठे समजतात. त्यांना कोणी नाही पण पक्षाने ओळख दिली. त्यांना दर्जा देण्यात आला आहे. ही त्यांची ओळख आहे.’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता माजी मंत्री जवाहर चावडा यांची प्रतिक्रिया समोर आली. आपली ओळख भाजपची नसून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याची आहे असा पलटवार त्यांनी केला.
माजी मंत्री जवाहर चावडा हे गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील आहेत. 2017 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर मनवदर विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन विधानसभेत पोहोचले. यानंतर त्यांनी तीन आमदारांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा दिला. मानवदर विधानसभा जागेवर पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपकडून जवाहर चावडा विजयी होऊन आमदार झाले. गुजरातच्या विजय रुपाणी सरकारमध्ये त्यांना पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री करण्यात आले.
जवाहर चावडा यांनी 2022 ची विधानसभा निवडणूक मानवदरमधून लढवली. परंतु, काँग्रेसच्या अरविंद लडाणी यांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळी चावडा यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगत भाजप नेतृत्वाकडे तक्रारही केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद लडानी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेचीही पोटनिवडणुक झाली. यात लडाणी यांचा विजय झाला असला तरी जवाहर चावडा यांनी त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
पक्षविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अरविंद लडाणी यांनी केली. त्यामुळे जवाहर चावडा यांच्यावर पक्ष काही कारवाई करणार का, अशी चर्चा होती. याचदरम्यान मनसुख मांडविया यांनी पक्ष विरोधात काम करणाऱ्या आणि स्वतःला मोठे नेते समजणाऱ्यांना सल्ला दिला होता. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या या वक्तव्याला चावडा यांनी उत्तर दिले आहे.