राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळे काँग्रेस सोडली : एसएम कृष्णा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

म्हैसूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात परराष्ट्र मंत्री राहिलेले एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नसताना सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करायचे. राहुल गांधींच्या याच हस्तक्षेपामुळे सरकार आणि काँग्रेसही सोडली, असं कृष्णा म्हणाले. ते गेल्या वर्षीच भाजपात दाखल झाले आहेत. एका […]

राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळे काँग्रेस सोडली : एसएम कृष्णा
Follow us on

म्हैसूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात परराष्ट्र मंत्री राहिलेले एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नसताना सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करायचे. राहुल गांधींच्या याच हस्तक्षेपामुळे सरकार आणि काँग्रेसही सोडली, असं कृष्णा म्हणाले. ते गेल्या वर्षीच भाजपात दाखल झाले आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना एसएम कृष्णा यांनी अनेक खुलासे केले. राहुल गांधींच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळेच परराष्ट्रमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, असं ते म्हणाले. राहुल गांधींच्या हस्तक्षेप करण्याच्या सवयीमुळेच काँग्रेस नाईलाजाने सोडावी लागली. काम करण्याचा दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता म्हणून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.

राहुल गांधी दहा वर्षांपूर्वी पक्षातील कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नव्हते. पक्षाच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा हस्तक्षेप असायचा. मनमोहन सिंह पंतप्रधान असतानाही अनेक महत्त्वाचे मुद्दे राहुल गांधींकडे चर्चेसाठी पाठवले जायचे, तर या विषयांची पंतप्रधानांना माहितीही नसायची. सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षांवर काँग्रेसचं कोणतंही नियंत्रण नव्हतं. त्यामुळेच यूपीए 2 सरकारच्या काळात एकावर एक मोठे असे 2 जी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, कोळसा घोटाळे झाले. कुणी निर्णायक नेतृत्त्व नसेल तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होते, असंही एसएम कृष्णा म्हणाले.

राहुल गांधींचा हस्तक्षेप हा घटनाबाह्य होता, असं एसएम कृष्णा यांनी स्पष्ट केलं. 2009 ते 2014 या काळात मी सरकारमध्ये होतो आणि सरकारच्या प्रत्येक चांगल्या-वाईट कामाची जबाबदारी आमच्यावर होती, असं ते म्हणाले. शिवाय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं सरकार, कॅबिनेट आणि घटकपक्षांवर कोणतंही नियंत्रण नसल्याचाही आरोप त्यांनी केला. सर्व कंट्रोल राहुल गांधींच्या हातात होतं आणि ते स्वतः एखादी घटनात्मक संस्था असल्यासारखं वागायचे, असा आरोप एसएम कृष्णा यांनी केला.

परराष्ट्र मंत्रीपदाचा राजीनामा देण्यामागचं कारणही राहुल गांधीच असल्याचं एसएम कृष्णा म्हणाले. परराष्ट्र मंत्री म्हणून साडे तीन वर्षांचा कार्यकाळ चांगला होता. पण मला हटवण्याचा आदेश राहुल गांधींनी दिला, कारण त्यांना 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मंत्री सरकारमध्ये ठेवायचे नव्हते. भाजपात सहभागी झाल्यानंतरही एसएम कृष्णा सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी एका रॅलीत सहभाग घेतला होता.