
Assembly elections 2023 | 28 नोव्हेंबर 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. मात्र त्याआधीच उमेदवारांच्या मनात धाकधुक निर्माण झालीय. राजस्थानच्या या विधानसभा निवडणुकीत काही ‘नियम आणि प्रथा’ बदलण्यात आल्या. यावरून बराच वादंग निर्माण झाला. एकीकडे भाजपला सत्ताबदलाची आशा वाटत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही आपलीच सत्ता येणार असे म्हणत आहे. मात्र, जनतेने घेतलेला अंतिम निर्णय 3 तारखेला जाहीर होणार आहे. परंतु, याच निवडणुकीत भाजपच्या सात खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण, लोकसभेचे सदस्य असलेले हे खासदार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
राजस्थानच्या जनतेने सलग दोन टर्म कुणाच्याही हाती सत्ता दिलेली नाही. हा गेल्या अनेक दशकांचा इतिहास आहे. भाजपची सत्ता असेल तर काँग्रेसला संधी दिली जाते आणि काँग्रेसची सत्ता असेल तर भाजपला विजयी केले जाते. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपने सात खासदारांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येते.
राजस्थानच्या जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार राज्यवर्धन सिंह राठोड हे विधानसभा लढवीत आहेत. राठोड यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून दिले होते. 2014 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. राठोड यांनी झोटवाडा मतदारसंघातून विधानसभा लढवीत आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे अभिषेक चौधरी यांच्याशी आहे. अभिषेक चौधरी हे राजस्थान विद्यापीठाचे विद्यार्थी नेते आहेत.
राजसमंद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार दिया कुमारी यांनीही विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जयपूर येथील विद्याधर नगर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. या निवडणुकीत भाजप जिंकल्यास दिया कुमारी यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते अशी राजस्थानच्या राजकारणात चर्चा आहे. दिया कुमार यांनी २०१३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2013 ते 2018 या काळात त्या सवाई माधोपूरच्या आमदारही होत्या.
राजस्थानचे ‘योगी’ या नावाने प्रसिद्ध असणारे बालकनाथ हे तिजारा मतदारसंघातून विधानसभा लढवीत आहेत. अलवर लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार आहेत. बालकनाथ यांची लढत काँग्रेसच्या इम्रान खान यांच्याशी आहे. यावेळी हा सामना सामान्य नसून भारत-पाकिस्तान सामना आहे असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.
मांडवा विधानसभेसाठी भाजप खासदार नरेंद्र कुमार आणि कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार रिटा चौधरी यांच्यात लढत होणार आहे. मांडवा विधानसभा झुंझुनू जिल्ह्यात येते. मांडवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र कुमार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी रिटा चौधरी यांचा पराभव केला होता. त्यामुळे पुन्हा त्यांना याच जागेवर लढवून भाजपने खेळी खेळलीय.
भाजपने किशनगड विधानसभेसाठी भगीरथ चौधरी यांना पसंती दिलीय. चौधरी सध्या अजमेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्याच्या नावाची घोषणा होताच भाजप नेते विकास चौधरी यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विकास चौधरी यांनी 2018 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे येथे भगीरथ चौधरी विरुद्ध काँग्रेसचे विकास चौधरी अशी लढत आहे.
सांचोर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या तीन टर्मपासून काँग्रेसने आपल्या ताब्यात राखला आहे. त्यामुळे राजस्थानमधील भाजपच्या शक्तिशाली नेत्यांमध्ये गणना असणारे देवजी एम. पटेल यांना भाजपने येथून उमदेवारी दिलीय. देवजी पटेल यांनी 2009, 2013 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि तिन्ही वेळा ते जिंकले आहेत.
भाजपने सवाई माधोपूर विधानसभा मतदारसंघातून राज्यसभेचे खासदार किरोरी लाल मीना यांना उमेदवारी दिली. सवाई माधोपूर ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसण्यासाठी भाजपने किरोरीलाल मीणा यांना मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे, काँग्रेसने विद्यमान आमदार दानिश अबरार यांना तिकीट दिले आहे. राजस्थानच्या राजकारणावर किरोरीलाल मीणा यांची चांगली पकड आहे. राज्यातील प्रभावी अशा मीणा आदिवासी गटाचे ते नेतृत्व करतात.