पुढील निवडणुका भाजप विरुद्ध सर्व, जे. पी. नड्डा यांचा स्वबळाचा नारा

| Updated on: Feb 16, 2020 | 3:13 PM

भाजपला एकट्याने विजयश्री मिळवायचा आहे, कोणी थांबवू शकणार नाही, असं भाजपाध्यक्ष जे पी नड्डा नवी मुंबईतील भाजपच्या अधिवेशनात म्हणाले

पुढील निवडणुका भाजप विरुद्ध सर्व, जे. पी. नड्डा यांचा स्वबळाचा नारा
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वबळाचा नारा दिला. “पुढील निवडणुका भाजप विरुद्ध सर्व अशा होणार” असल्याचं नड्डांनी ठणकावून (J P Nadda BJP Council Meeting) सांगितलं.

महाराष्ट्रातील चित्र तुम्हाला पालटायचं आहे. एक गंभीर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. ‘ऑल व्हर्सेस वन-भाजप’ अशी तयारी तुम्हाला करायची आहे. आपल्याला एकट्याने विजयश्री मिळवायचा आहे, कोणी भाजपला थांबवू शकणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो, असं जे पी नड्डा भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

जे पी नड्डा यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेसोबत पुनर्मिलनाच्या आशा मावळल्या आहेतच. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसोबत भाजपची युती होण्याची शक्यताही धूसर झाल्याचं दिसत आहे.

भाजपच्या अधिवेशनात महाविकास आघाडीविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला. महाविकास आघाडीकडून जनादेशाचा अनादर करण्यात आला आहे. विश्वासघाताला महाराष्ट्र माफ करणार नाही, असं म्हणत माजी मंत्री संजय कुटेंनी प्रस्ताव मांडला.

दरम्यान, राज्यातील सरकार पाडण्याची गरज नाही. सरकारमधील विसंवादामुळे हे सरकार पडेल, असं प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं होतं.

हेही वाचा : नवी मुंबईवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी पायाभरणी, देवेंद्र फडणवीस आक्रमक

भाजपचं आजचं अधिवेशन हे महत्त्वपूर्ण आहे. अधिवेशनातून नवीन ऊर्जा घेऊन आता सर्व कामाला लागतील, असं माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. राज्यात जनादेश मिळाला होता, पण काही लोकांनी मागच्या दाराने सरकार बनवलं, अशी टीकाही विखेंनी शिवसेनेवर नाव न घेता केली.

भाजपच्या अधिवेशनात मंचावर आयाराम नेत्यांना पहिल्या रांगेत मान देण्यात आला होता. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. सुरुवातीला चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक पहिल्या रांगेत, तर खडसे दुसऱ्या रांगेत होते. (J P Nadda BJP Council Meeting)