भाजप आमदाराने जाहीर केलंय 25 लाखांचं बक्षीस, काय करावं लागणार? वाचा!

| Updated on: Nov 15, 2022 | 2:11 PM

येत्या 18 डिसेंबर रोजी राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे.

भाजप आमदाराने जाहीर केलंय 25 लाखांचं बक्षीस, काय करावं लागणार? वाचा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

संजय सरोदे, जालनाः मराठवाड्यातल्या एका भाजप आमदाराने (BJP MLA) कार्यकर्त्यांना मोठी ऑफर दिली आहे. राज्यात ग्राम पंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat Election) बिगुल वाजलाय. अशा वेळी माझ्या मतदारसंघातल्या ज्या ज्या ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक होईल, तिथे 25 लाख रुपयांचा विकास निधी बक्षीस म्हणून दिला जाईल, अशी घोषणा या आमदाराने केली आहे. भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांनी ही ऑफर दिली आहे. गावात शांततेने निवडणुका पार पाडाव्यात, सामंजस्य टिकून राहावे, अशी भावना असल्याचं नारायण कुचे यांनी सांगितलंय.

नारायण कुचे हे जालना जिल्ह्यातील अंबड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. या मतदारसंघाअतर्गत 28 ग्रामपंचायती येतात. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अंबड येथील गावांचा समावेश आहे.

येत्या 18 डिसेंबर रोजी राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. त्यासाठीची आचारसंहितादेखील लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांचा निकाल २० डिसेंबर रोजी लागणार आहे. मात्र अंबडमधील सर्वच 28 ग्रामपंचायतींचा निकाल बिनविरोध लागला पाहिजे, असं वक्तव्य भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलं.
नारायण कुचे यांनी अंबड तालुक्यात जेवढ्या ग्रामपंचायतील आहेत, त्यांना बोलावून गावाची परिस्थिती समजून घेतली. यावेळी दीपक भूयार, अवधूत नावा, भीमराव डोंगरे, जितुभाऊ पालकर आदी उपस्थित होते. आम्ही ग्रामपंचायतींचा आढावा घेतल्याचं नारायण कुचे म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, ज्या ज्या निवडणुका बिनविरोध होतील… तिथे 25 लाख रुपये विकासासाठी देणार.
फक्त गावाने बिनविरोध निवडणूक झाली तर हे बक्षीस असेल. मागील ग्रामपंचायतींच्या वेळीही बिनविरोध निवडणुकांनंतर 21लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता, अशी माहिती नारायण कुचे यांनी दिली.

भाजप विकास आणि विचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं.