Jay Pawar: ‘आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश…’, जय पवारांची अजित दादांसाठी हृदयस्पर्शी पोस्ट!
अजित दादांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे, सोबतच राज्यात दुष्काळाचे सावट आहे. यामुळेच यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.

विक्रम वरे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी
Jay Pawar Emotional Post About Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, जय पवार यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. जय पवार हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. यावेळी जय पवार यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अजित पवारांसाठी जय पवार यांची भावुक पोस्ट
राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मतिस्थळाचे दर्शन घेतले. यासोबतच त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत दादांच्या आठवणींना उजाळा दिला. “दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता, Dad. तुमच्या सहवासाने घर उजळलं, तुमच्या प्रेमाने कुटुंब एकत्र राहिलं आणि तुमच्या विचारांनी आयुष्याला दिशा मिळाली. आज तुमच्या स्मृतिस्थळी येऊन आशीर्वाद घेतले. तुम्ही दिलेला प्रकाश कधीही मावळणार नाही,” अशा भावुक शब्दात जय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यंदा बारामतीत दिवाळी नाही..!
राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजकीय वर्तुळातही दिवाळीची धामधुम सुरु आहे. मात्र बारामतीमध्ये पवार कुटुंबियांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. 28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित दादांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे, सोबतच राज्यात दुष्काळाचे सावट आहे. यामुळेच यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर!
दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बडे नेते भेटून गेले, त्यासोबतच त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी खासदार पार्थ पवार यांनी दोनदा शरद पवार यांची भेट घेतली. ज्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.