“जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला”, जयंत पाटील यांची माहिती

| Updated on: Nov 14, 2022 | 3:23 PM

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिलाय, अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला, जयंत पाटील यांची माहिती
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर माझ्यावर लावलेले आरोप आणि गुन्हे खोटे आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर राजीनामा देऊ नये, असं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला . पण आव्हाड आपल्या निर्णयावर ठाम होते आणि अखेर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा (Jitendra Awhad Resignation) दिलाय. याबाबतची माहिती जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.या चर्चेनंतर जयंत पाटील आणि आव्हाड यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिल्याचं या पत्रकार परिषदतेत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी मी प्रयत्न केले. त्यांना बराच वेळ समजावलं. पण असे खोटे गुन्हे दाखल होणं त्यांच्या मनाला लागलंय. जो गुन्हा कधी केलाच नाही, त्यासंदर्भात गुन्हा दाखल होत असेल तर योग्य नाही. या घटनेचा व्हीडिओ सर्वत्र उपलब्ध आहे. त्यात स्पष्टपणे सगळं दिसतंय. यात कुठेही काही चुकीचं दिसत नाही. तरीही असा गुन्हा दाखल केला गेला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला. याबाबत मी शरद पवार यांच्याशीही बोललो आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलंय.

माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तरी मी घाबरणारा नाही. पण विनयभंगाचा गुन्हा दाखल होणं, माझ्या तत्वात बसत नाही. माझा स्वभाव अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल होणं माझ्या मनाला वेदना देणारा आहे, असं आव्हाड म्हणाले. हे बालताना आव्हाड गहिवरले.

विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. आता त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिलीय.

आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. आता हा राजीनामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्विकारतात का?, हे पाहाणं महत्वाचं असेल.