आधी भाजप इच्छुकाचं शक्तीप्रदर्शन, आता शिवसेनेने ताकद दाखवली, कागलमध्ये युतीची डोकेदुखी

| Updated on: Sep 17, 2019 | 5:47 PM

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसं कागलमधील (Kagal Vidhan Sabha ) राजकीय वातावरण तापू लागलं आहे. युतीचा फॉर्म्युला ठरण्याआधीच शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे (Sanjay Ghatge) यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला.

आधी भाजप इच्छुकाचं शक्तीप्रदर्शन, आता शिवसेनेने ताकद दाखवली, कागलमध्ये युतीची डोकेदुखी
Follow us on

Kagal Vidhan Sabh कोल्हापूर : शिवसेना-भाजप (Shiv Sena BJP) युती होणार असल्याचं दोन्ही पक्षाकडून ठणकावून सांगितलं जात आहे. मात्र राज्यभरात अशा काही जागा आहेत त्यांचा तिढा सोडवताना दोन्ही पक्षांच्या नाकी नाऊ येणार आहेत. अशा जागेपैकीच एक जाग म्हणजे कागल विधानसभा (Kagal Vidhan Sabha ) मतदारसंघ.

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसं कागलमधील (Kagal Vidhan Sabha ) राजकीय वातावरण तापू लागलं आहे. युतीचा फॉर्म्युला ठरण्याआधीच शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे (Sanjay Ghatge) यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला.

विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच भाजपचे इच्छुक उमेदवार समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनीही आपला प्रचाराचा नारळ फोडला. युतीतील या जागेसाठी भाजप आग्रही आहे. मात्र शिवसेनादेखील आपल्या वाट्याची ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही. म्हणूनच आज खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत संजयबाबा घाटगे यांनी शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचं संजयबाबा घाटगे यांनी आज  पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

अदला बदलीसाठी प्रयत्न

जागांच्या अदलाबदली मध्ये ही जागा भाजपला मिळावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र यावर अधिकृत निर्णय झाला नसतानाच समरजितसिंह घाटगे यांनी रणशिंग फुंकलं. समरजितसिंह घाटगे यांच्या शक्तीप्रदर्शनाने शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांची अस्वस्थता वाढवली होती. त्यामुळेच आज संजयबाबा घाटगे यांनीही शक्तीप्रदर्शन करुन आपलीही दावेदारी सादर केली.

हसन मुश्रीफ यांच्यासमोर कुणाचं आव्हान?

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा तेच कागलमधून निवडणूक लढवतील यात शंका नाही. आघाडीत या जागेचा तिढा नाही. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध शिवसेना की भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कागल विधानसभा मतदारसंघ (Kagal Vidhan Sabha)

संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हणून कागलकडे पाहिलं जातं. याठिकाणी पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रीत गटाचं राजकारण चालतं. सध्या याठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आहेत. त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेचे संजय घाटगे यांचा पराभव केला. त्यावेळी मुश्रीफ यांना 1,23,626 मतं मिळाली होती, तर घाटगे यांना 1,17,697 मतं मिळाली होती. मात्र आता या संघाचं रुपडं पालटलं आहे. कारण खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी समरजितसिंह घाटगे यांना तयारीला लागण्यास सांगितलं आहे. त्यामुळं ही जागा भाजप मागू शकते.

समरजित सिंह यांनी देखील गेल्या चार वर्षांपासून कामाचा धडका लावला आहे. त्यामुळंच मुश्रीफ आणि समरजितसिंह यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. जर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली तर भाजप समरजितसिंह यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रय़त्न करणार आहे. कारण मुश्रीफांचा पराभव केला तर जिल्ह्यात भाजपला विरोध करणारं राष्ट्रवादीचं कोणी उरणारच नाही.

संबंधित बातम्या 

मतदारसंघ शिवसेनेचा, मुश्रीफांविरोधात भाजप नेत्याच्या प्रचाराचा शुभारंभ  

कोल्हापूरचा आढावा : लोकसभा झाली, आता विधानसभेला कुणाचं काय-काय ठरलंय?   

पवारांचं सतेज पाटलांवर कागलमध्ये भाष्य नाही, मात्र हातकणंगलेत जाऊन टीका