आईची मृत्यूशी झुंज, तरीही कोरोना काळात जनतेसाठी रस्त्यावर; जाणून घ्या, राजेश टोपेंविषयी!

| Updated on: Mar 23, 2021 | 6:45 PM

राज्यातील कोरोना संकटाच्या काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विशेष काम केलं. अत्यंत संयमाने त्यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळली. (know health minister rajesh tope political journey)

आईची मृत्यूशी झुंज, तरीही कोरोना काळात जनतेसाठी रस्त्यावर; जाणून घ्या, राजेश टोपेंविषयी!
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई: राज्यातील कोरोना संकटाच्या काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विशेष काम केलं. अत्यंत संयमाने त्यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळली. बैठका, प्रत्यक्ष भेटी, दिल्लीतील आरोग्य विभाशी संपर्क आदींच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याकाळात त्यांची आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. तरीही राजेश टोपे रस्त्यावर उतरून काम करत होते. अत्यंत निष्ठेने जनतेसाठी वाहून घेतलेले राजेश टोपे आहेत तरी कोण? त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश… (know health minister rajesh tope political journey)

घरातच राजकारणाचं बाळकडू

राजेश टोपे यांना फार संघर्ष करून राजकारणात यावं लागलं नाही. घरातूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे वडील अंकुशराव टोपे मराठवाड्यातील मोठं प्रस्थं होतं. ते माजी आमदार आणि माजी खासदारही होते. शिवाय सहकार क्षेत्रातही त्यांचं मोठं नाव होतं. त्यामुळे राजेश टोपे यांना राजकारणात पाय रोवण्यासाठी फारसे परिश्रम करावे लागले नाही. राजकारणाचा मंच त्यांच्यासाठी तयार होता, फक्त त्यांना त्यांची योग्यता सिद्ध करून टिकून राह्यचे होते आणि त्यात त्यांनी यशही मिळविले आहे.

23 व्या वर्षी राजकारणात

राजेश टोपे यांनी अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतलेली आहे. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी राजकारणातही भाग घेतला. वयाच्या 23 व्या वर्षी ते जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जिल्हास्तरावरील राजकारणात सक्रिय असतानाच त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूकही लढवली आणि विजयीही झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेपासून ते मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. ग्रामस्तरावर छोट्या छोट्या समस्या कशा उद्भवतात आणि त्यातून कसा मार्ग काढायचा असतो, याची त्यांना चांगलीच जाण आहे. त्यामुळेच कोरोना परिस्थिती हाताळताना त्यांनी अत्यंत सुक्ष्म गोष्टींचाही विचार करून राज्याला मोठ्या संकटापासून वाचवलं.

पहिली निवडणूक, पहिला पराभव

जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवली. 1996मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवाने ते डगमगले नाहीत. त्यानंतर 1999मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. त्यानंतर सलग पाच वेळा ते निवडून आले आहेत.

औटघटकेचं मंत्रिपद

1999 मध्ये विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. पण हे मंत्रिपद औटघटकेचं ठरलं. पक्षांतर्गत राजकारणाचा नवख्या राजेश टोपेंना फटका बसला आणइ त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं. मात्र, मार्च 2001मध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागेवळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी 14 वर्षे त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे.

महत्त्वाची खाती सांभाळली

राजेश टोपे यांनी राज्यातील महत्त्वाची खाती यशस्वीपणे सांभाळली आहेत. जलसंधारण, ऊर्जा, पर्यावरण, नगरविकास, कमाल नागरी जमीन धारणा, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सामान्य प्रशासन, सांसदीय कार्य आदी खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. आता त्यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. टोपे यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून पाच वेळा आणि कॅबिनेट मंत्री म्हणून सहावेळा शपथ घेतली आहे.

तरीही जिंकून दाखवलं…

राजेश टोपे यांनी त्यांच्या वडिलांच्या हयातीत विधानसभेच्या चार निवडणुका लढल्या आणि जिंकल्याही. अर्थात अंकुशराव टोपे ही बडी असामी असल्याने राजेश टोपे यांचा विजय होणारच हे ठरलेलंच असायचं. त्यामागे सहकार आणि कृषी क्षेत्रात अंकुशराव टोपे यांनी केलेल्या कामाचा मोठा हात होता. तसेच त्यांचे संस्थात्मक जाळं आणि दांडगा लोकसंपर्क ही सुद्धा जमेची बाजू होतीच. परंतु वडिलांच्या निधनानंतरही राजेश टोपे यांनी विजयाची परंपरा कायम राखली. वडिलांच्या निधनानंतरच्या निवडणुकीत मेहनत अधिक घ्यावी लागली, परंतु हा अनुभवही त्यांच्या गाठीशी आला.

बचावात्मक राजकारण

राजेश टोपे हे मृदू, शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. त्यांचं राजकारण नेहमीच बचावात्मक पावित्र्याचं राहिलं आहे. आक्रमक राजकारण करणं, राजकीय शत्रू निर्माण करणं, प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी काही तरी स्टेटमेंट करणं आदी गोष्टी त्यांच्या स्वभावात बसत नाहीत. कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर ते प्रतिक्रिया देत नाहीत. दिली तरी मोघम आणि सावध प्रतिक्रिया असते. त्यामुळे ते वादग्रस्त असे कधी ठरले नाहीत. (know health minister rajesh tope political journey)

आई आजारी, तरीही काम सुरू

राज्यात मार्चमध्ये कोरोनाचं संकट आलं आणि मार्चमध्येच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राजेश टोपेंसाठी आरोग्य मंत्री म्हणून हा काळ कसोटीचा होता. मात्र, त्यांनी ही परिस्थिती संयमाने हाताळायला सुरुवात केली. परंतु कोरोनाचा कहर प्रचंड झपाट्याने वाढायला लागला. हॉस्पिटल तुडुंब भरायला लागली. मृतांचे आकडेही वाढायला लागेल. त्याचवेळी अर्थव्यवस्थाही ठप्प झाली. चोहोबाजूने संकटाचा सामना सुरू असतानाच राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे या आजारी पडल्या. त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती नाजूक होती आणि त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. अशाही परिस्थितीत राजेश टोपे यांनी कोरोनाचं संकट निवारण्याचं काम सुरूच ठेवलं. रात्र न् दिवस टोपे काम करत होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतरही टोपे यांनी जराही उसंत न घेता कोरोनाचं संकट रोखण्यासाठी काम सुरू ठेवलं. (know health minister rajesh tope political journey)

 

संबंधित बातम्या:

‘सुपारी बाग’ व ‘बाकडा कंपनी’ला ‘अडकित्ता बाग’चा पर्याय; कसं आहे ‘संकटमोचक’ गिरीश महाजनाचं राजकारण!

वयाच्या 13व्या वर्षी संघात, आणीबाणीत भूमिगत नेत्यांना मदत; हरिभाऊ बागडेंची दमदार इनिंग!

लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?

(know health minister rajesh tope political journey)