कुठल्या बाबा-अंगाऱ्यामुळे मंत्री झाले माहित नाही, पण मंत्रिपद दोन-चार महिन्यावर टिकणार नाही : धनंजय महाडिक

| Updated on: Feb 08, 2020 | 7:52 AM

पुन्हा आम्ही सत्तेत आल्यानंतर आमचे लोक तुमच्या पाठीमागे लागले, तर तुम्हाला ते झेपणार नाही, असा सूचक इशाराही धनंजय महाडिक यांनी दिला.

कुठल्या बाबा-अंगाऱ्यामुळे मंत्री झाले माहित नाही, पण मंत्रिपद दोन-चार महिन्यावर टिकणार नाही : धनंजय महाडिक
Follow us on

कोल्हापूर : कुठला अंगारा, कुठला बाबा यांच्याकडे आहे माहित नाही, हे पुन्हा मंत्री झाले. पण हे मंत्रिपद दोन-चार महिन्यांच्यावर टिकणार नाही, अशा शब्दात कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा (Dhananjay Mahadik on Satej Patil) साधला.

हे सुद्धा आता मंत्री झाले. नशिब बघा, पुन्हा आता मंत्री झाले. माहित नाही कुठला बाबा, कुठला अंगारा यांच्याकडे आहे. आता मंत्री झाले ठीक आहे, त्यांचं नशीब आहे, तरुण आहेत. चांगली कामं करता येण्यासारखी आहेत. पण ते न करता, मंत्रिपद घेतल्या घेतल्या यांच्या कार्यकर्त्यांनी उद्योग सुरु केले आहेत, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली.

काँग्रेस आमदार सतेज पाटलांकडे गृह, गृहनिर्माण, परिवहन विभागाचं राज्यमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. राष्ट्रवादीत असलेल्या धनंजय महाडिकांचं सतेज पाटलांशी राजकीय वैर सर्वश्रुत आहे.

आमच्या कार्यकर्त्यांच्या घरावर रात्री दगडं मारणे, केबल कापणे, महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर गुरगुरणे, रडवणे, दादागिरी करणे… मला त्यांच्या चमच्यांना सांगायचं आहे, बाबांनो, जास्त उड्या मारु नका. हे मंत्रिपद काय दोन-चार महिन्यांपेक्षा जास्त राहणार नाही, असा टोलाही धनंजय महाडिक यांनी लगावला.

पुन्हा आम्ही सत्तेत आल्यानंतर आमचे लोक तुमच्या पाठीमागे लागले, तर तुम्हाला ते झेपणार नाही, असा सूचक इशाराही धनंजय महाडिक यांनी दिला. 13 व्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्धाटनानंतर ते काल कोल्हापुरात बोलत होते.

जय-पराजय होत असतात. मी चार निवडणुका लढवल्या, तीन पराभूत झालो. महादेवराव महाडिक दोन वेळा पराभूत झाले, दोन तीन वेळा निवडून आले. पण आम्ही पराभूत झालो, म्हणून टीव्ही फोडले नाहीत, दोन-चार मोबाईल फोडले नाहीत, दाढी वाढवून अज्ञातवासात गेलो नाही. पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ऑफिसात बसलो लोकांची सेवा
करायला, असा टोमणाही महाडिकांनी सतेज पाटलांना (Dhananjay Mahadik on Satej Patil) लगावला.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शेती करता यावी, यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. तीन दिवस शेतकऱ्यांना अनेक प्रयोग इथे पाहायला मिळणार आहेत.