गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांना धक्का, माजी आमदाराने चार दिवसात आघाडी सोडली

| Updated on: Mar 27, 2021 | 8:30 AM

गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकरांनी स्पष्ट केलंय. (Rajarshi Shahu Shetkari Aghadi)

गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांना धक्का, माजी आमदाराने चार दिवसात आघाडी सोडली
सतेज पाटील
Follow us on

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे (Kolhapur Gokul Doodh Sangh Election) कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत (Rajarshi Shahu Shetkari Aghadi) अवघ्या चार दिवसात फूट पडली. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. (Kolhapur Gokul Doodh Sangh Election former MLA left Rajarshi Shahu Shetkari Aghadi)

आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरुडकरांनी निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलंय.

आबिटकर आणि राजेश पाटीलही नाराज

दुसरीकडे, आमदार प्रकाश आबिटकर आणि राजेश पाटीलही नाराज असल्याची माहिती आहे. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत राहण्याबाबत ते दोघेही आज निर्णय घेणार आहेत.

गोकुळ मधील विरोधकांना एकत्र आणण्याचा पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रयत्न होता. मात्र तालुका स्तरावरील राजकारण विरोधकांची मोट बांधताना आडवं येऊ लागलं आहे. या गळतीमुळे राजर्षी शाहू आघाडीत अवघ्या काही दिवसांतच अस्वस्थता पसरली आहे.

राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोना परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून लांबलेली ही निवडणूक 2 मे रोजी होणार आहे. मतदान महिन्याभरानंतर होणार असलं तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण गेल्या दोन महिन्यापूर्वीपासूनच तापायला सुरुवात झाली आहे.

गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून सत्ताधारी महाडिक गटाविरुद्ध भूमिका घेणाऱ्या पालकमंत्री सतेज पाटील या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना एकत्र आणत सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा केली.

गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?

दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक

रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन

मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी

गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल

गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात

आमदारकी नको पण गोकुळचा संचालक बनवा, असा कोल्हापूर जिल्ह्यात वाक्यप्रयोग आहे. यावरुनच गोकुळच्या वैभवाचा अंदाज येऊ शकतो. एकीकडे आर्थिक सत्ताकेंद्र मिळवण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंबर कसली असताना त्यांना सत्ताधारी महाडिक गटाच्या नाराज संचालकांचीही साथ मिळाली आहे. दूध संघात काय बोलतो, यापेक्षा कोण बोलतो याला महत्त्व दिलं जातं.

संबंधित बातम्या :

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान

सत्ताधारी गटातील संचालक विरोधकांच्या गळाला, गोकुळ दूध संघ निवडणुकीत चुरस

(Kolhapur Gokul Doodh Sangh Election former MLA left Rajarshi Shahu Shetkari Aghadi)