अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज काहीही होऊ शकतं : अजित पवार

| Updated on: Dec 21, 2019 | 10:06 AM

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar farm loan waiver) यांनी दिले.

अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज काहीही होऊ शकतं : अजित पवार
Follow us on

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar farm loan waiver) यांनी दिले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काहीही होऊ शकतं असं अजित पवार म्हणाले.  “शेतकऱ्यांबाबत हे सरकार सकारात्मक आहे, विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी चांगला निर्णय ऐकायला मिळेल, असं अजित पवार (Ajit Pawar farm loan waiver)  म्हणाले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात हजेरी लावण्यापूर्वी अजित पवारांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, हेक्टरी 25 हजाराची घोषणा होऊ शकते का असे प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आले.

त्यावर अजित पवार म्हणाले, “मी शासनाचा घटक नाही. मी मंत्रीही नाही. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या पक्षाने पुढाकार घेतला आहे. आम्ही पहिल्यापासूनच शेतकऱ्यांबाबत सकारात्मक आहोत. त्यामुळे ज्या गोष्टी सभागृहात बोलायच्या असतात, त्या बाहेर बोलणं योग्य होणार नाही. मला वाटतं शेतकऱ्यांबाबत आज चांगला निर्णय होईल, असं माझं मन मला सांगतंय”

कर्जमाफीची घोषणा होणार नाही असं कोण म्हणतं? तसंच आजच कर्जमाफीचा निर्णय होईल असंही कोण म्हणतं? आज काहीही होऊ शकतं, असं म्हणत अजित पवारांनी संभ्रम निर्माण केला.

विदर्भात अधिवेशन असल्यामुळे, विदर्भातील आणि राज्यातील शेतकऱ्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आधीच म्हणाले आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं.

आजपर्यंची परंपरा आहे की अधिवेशनातून काहीतरी घोषणा होऊ शकते. लोकांचं लक्ष असतं, पॅकेज काय मिळतं. त्यामुळे  उद्धवजी प्रमुख असल्यामुळे त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. सकारात्मक ऐकायला मिळेल, असं अजित पवार म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार

नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, मला जी जबाबदारी पक्ष देईल, ती जबाबदारी मी पार पाडेन, असं अजित पवार म्हणाले. आमच्या पक्षात कोणाला उपमुख्यमंत्री करायचं हे शरद पवार ठरवतील. उद्धवजींनी मनात आणलं तर 31 डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. विस्ताराबाबत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं अजित पवारांनी नमूद केलं.