राज्यपालांच्या वर्तनावरुन महाआघाडीचे नेते नाराज, आमदार नियुक्तीवरुन ठिणगी

| Updated on: Dec 30, 2019 | 8:32 PM

आता नव्याने पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे (Leaders of MahaVikasAghadi on Governor Koshyari). यावेळी राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या मुद्द्यावरुन ठिणगी पडली आहे.

राज्यपालांच्या वर्तनावरुन महाआघाडीचे नेते नाराज, आमदार नियुक्तीवरुन ठिणगी
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच चर्चेत आहेत. अनेकदा त्यांच्यावर पक्षपातीपणाचाही आरोप झाला. त्यांच्या निर्णयांचे पडसाद अगदी सर्वोच्च न्यायालयातही उमटले. आता नव्याने पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे (Leaders of MahaVikasAghadi on Governor Koshyari). यावेळी राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या मुद्द्यावरुन ठिणगी पडली आहे.

महाविकासआघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 2 आमदारांची नावे राज्यपालांना पाठवली आहेत. त्याला आता 15 दिवस उलटून गेली आहेत. तरिही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या नावांना मंजूर देत स्वाक्षरी केलेली नाही. राज्यपाल पहाटे उठून शपथविधी घेत तत्परता दाखवतात. मात्र, आमदारांच्या नियुक्तीबाबत ही तत्परता दिसत नसल्याचा टोला आघाडीच्या नेत्याकडून लगावला जातो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली आहेत. यात आदिती नलावडे आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावाचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यात देखील अधिक कठोरपणा दाखवला. काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना निसर्गाचा, मानवतेचा आणि राज्यघटनेचा उल्लेख करण्यावर कोश्यारी यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच पाडवी यांना दरडावत पुन्हा शपथ घेण्यास भाग पाडले. यावरुनही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात नाराजी आहे.

मध्यरात्री उठून पहाटे शपथविधी करण्यात राज्यपाल जितकी तत्परता दाखवतात, तितकी तत्परता कामात दाखवत नाही. राज्यपालांचं आजचं वागणं देखील चमत्कारिक आहे, असंही मत आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातही हा संघर्ष दिसणार की यावर तोडगा निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.