भाजपच्या 30 विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार : सूत्र

| Updated on: Sep 26, 2019 | 7:07 PM

कोअर ग्रुपच्या बैठकीसाठी (BJP core group meeting) भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

भाजपच्या 30 विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार : सूत्र
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक (BJP core group meeting) झाली. राज्यातील 122 पैकी 30 आमदारांचं तिकीट कापणार असल्याची माहिती आहे. याबाबतचा निर्णय या बैठकीत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोअर ग्रुपच्या बैठकीसाठी (BJP core group meeting) भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार याद्या निश्चितचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. भाजपचीही यासाठीच दिल्लीत बैठक झाली. महत्त्वाचं म्हणजे विद्यमान 30 आमदारांचा (BJP to cut seating MLA ticket) पत्ता भाजपकडून कट केला जाऊ शकतो. ज्या आमदारांच्या सर्व्हेमध्ये नकारात्मक कामगिरीचा अहवाल आला, अशा आमदारांना यंदा तिकीट मिळणार नाही.

लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं होतं. यामध्ये किरीट सोमय्या, सोलापूरचे शरद बनसोड, पुण्याचे अनिल शिरोळे, नगरचे दिलीप गांधी, दिंडोरीचे हरीशचंद्र चव्हाण, लातूरचे सुनील गायकवाड यांचा समावेश होता.

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकत, सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यंदा भाजपची शिवसेनेसोबत युती आहे. युती करताना दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवण्याचं ठरलं होतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता. त्यामुळे आता दोन्ही पक्षात कोणता फॉर्म्युला निश्चित होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जर फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला, तर भाजपला तिकीट वाटप करताना मोठी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी भाजपने केली आहे. अंतर्गत संस्थांनी सर्व्हे करुन या आमदारांची माहिती मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरुन त्यांची तिकीटं धोक्यात आली आहेत.

जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, अंबरिशराजे आत्राम यांचा समावेश होता. आता या माजी मंत्र्यांना भाजपकडून तिकीटं दिली जातात की नाही हे पाहावं लागेल.