शिवसेना आमदार कांदेंचा अंडरवर्ल्ड गँगमधून धमकीच्या फोनचा दावा, भुजबळांनी सूत्रं फिरवली, पोलिसांना महत्त्वाचे आदेश 

| Updated on: Sep 29, 2021 | 7:45 AM

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर आहे म्हणत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

शिवसेना आमदार कांदेंचा अंडरवर्ल्ड गँगमधून धमकीच्या फोनचा दावा, भुजबळांनी सूत्रं फिरवली, पोलिसांना महत्त्वाचे आदेश 
छगन भुजबळ आणि सुहास कांदे
Follow us on

नाशिक : नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. तसा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

भुजबळांचे नाशिक पोलिसांना महत्त्वाचे आदेश

महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर आहे म्हणत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अश्या प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचं म्हणत नाशिक पोलिसांनी तातडीने तपास करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कांदे-भुजबळ यांच्यातला नेमका वाद काय?

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून ही शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरून तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल, असं सांगितलं. मात्र, दोघांतली खडाजंगी चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर भुजबळ यांच्याविरोधात आमदार कांदे यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यात छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. इतकेच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

खरंच, छोटा राजन टोळी सक्रिय?

कांदे यांनी दाखल केलेली याचिका मागे घ्यावी, अशी धमकी देणारा फोन मंगळवारी शिवसेना आमदार सुहास कांदे यांना आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने 9664666676 या क्रमांकावरून दूरध्वनी केला. कांदे यांनी याचिका मागे घ्यावी, अन्यथा आमच्याशी गाठ असल्याची धमकी त्याने दिली. या फोननंतर कांदे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देत तक्रार दाखल केल्याचे समजते. एकंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील या जोरदार राजकीय खडाजंगी जिल्ह्यात चवीने चर्चा सुरू आहे.

(Maharashtra Minister Chhagan Bhujbal Order Nashik Police Over Shivsena MLA Suhas kande Claim Chhota Rajan Threat Phone Call Case)

हे ही वाचा :

भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदार कांदेंना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी