NCP News: सुनील तटकरे- पटेलांची आडमुठी भूमिका, आता यु-टर्न; शरद पवारांच्या शिलेदाराने सुनावलं
सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती . विलीनीकरणा संदर्भात नाही नाही चर्चा झाली असे म्हणाले. त्यांनीच आता 90 अंशाचा युटर्न घेतला आहे त्यांच्या मनामध्ये ओठांमध्ये पोटामध्ये काय आहे हे मी सांगू शकत नाही," असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.

NCP Merjer News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरुन राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्वप्रथम विलिनीकरणावरुन बॉम्ब फोडला अन् दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळाले. मात्र आता दोन्ही गटांकडून विलिनीकरण होणार नाही, असं स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी याबाबत सर्वात मोठे अन् महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणालेत अंकुश काकडे?
“राष्ट्रवादीचे काही नेते शरद पवार साहेब यांच्या संपर्कात आहेत, काही जण सिल्वर ओकला भेटत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार पवार साहेबांना भेटणार आहेत. कदाचित ते दिवाळीच्या शुभेच्छा आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटणार असतील.मात्र काही काळापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली होती . विलीनीकरणा संदर्भात नाही नाही चर्चा झाली असे म्हणाले. त्यांनीच आता 90 अंशाचा युटर्न घेतला आहे त्यांच्या मनामध्ये ओठांमध्ये पोटामध्ये काय आहे हे मी सांगू शकत नाही,” असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सुनील माने यांनीही या चर्चांवर फुलस्टॉप लागल्याचे सांगितले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आमचे नेते पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच रोहित पवार यांनीही विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यासाठी संपलेला आहे असं सांगितलेले आहे, असं त्यांनी स्पष्ट केले होते.
दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार साहेबांना भेटणार!
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ शरद पवारांना भेटून गेले. त्यानंतर आता सर्व आमदारांनी वेळ मागितल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.