जम्मू-काश्मीरच्या घडामोडींवर मेहबुबा-अब्दुल्लांचे इंटरेस्टिंग ट्वीट

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजकारणात काल मोठी घडामोड घडली. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित केली. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. यासाठी 56 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्रही त्यांनी राज्यपालांना दिलं. पण त्याआधीच राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केली. यावर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. “आजच्या टेक्नोलॉजीच्या युगात राजभवनातील फॅक्स मशीनवर […]

जम्मू-काश्मीरच्या घडामोडींवर मेहबुबा-अब्दुल्लांचे इंटरेस्टिंग ट्वीट
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजकारणात काल मोठी घडामोड घडली. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित केली. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. यासाठी 56 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्रही त्यांनी राज्यपालांना दिलं. पण त्याआधीच राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केली.

यावर मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.

“आजच्या टेक्नोलॉजीच्या युगात राजभवनातील फॅक्स मशीनवर आमचा फॅक्स आला नाही, पण विधानसभा विसर्जित करण्यात येत असल्याचा आदेश लगेच जारी झाला, हे खरंच विचित्र आहे”, असेही त्या म्हणाल्या.

त्यांच्या या ट्वीटला रिट्विट करत नॅशनल काँफरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले,

“मी कधी विचारही केला नव्हता की, मी तुमच्याशी सहमत होवून तुमच्या कुठल्याही वक्तव्याला रिट्विट करेन. राजकारण खरोखरंच एक विचित्र जग आहे. पुढील लढाईकरिता शुभेच्छा”.

ओमर अब्दुल्ला यांनी 15 मिनटांत चार वेळा मेहबुबा मुफ्तींच्या ट्विटवर रिट्विट केले. सोबतच त्यांनी एक जीआयएफ देखील शेअर केला, ज्यात एका फॅक्स मशीनमधून फॅक्स बाहेर येतो आणि तो सरळ खाली ठेवलेल्या श्रेडिंग मशीनमध्ये जातो. ज्यावर मेहबुबा मुफ्तींनी रिट्विट करत एक मजेशीर फोटो शेअर केला. यामध्ये एक मानवी हाडांचा सापळा आहे. ज्याखाली “प्रतिसादाच्या प्रतिक्षेत” असे लिहिले आहे.


नेमकं प्रकरण काय ?

जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित केली आहे. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी काही वेळापूर्वीच सत्तास्थापनेचा दावा केला होता. यासाठी 56 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्रही त्यांनी राज्यपालांना दिलं. पण त्याआधीच राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केली.

जम्मू काश्मीरमध्ये भाजपने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्यापासून राज्यपाल राजवट लागू आहे. त्यानंतर आता अचानक काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने युती करत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा होती. मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातही याचा उल्लेख केला होता.

पीडीपी हा 29 जागांसह जम्मू काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष आहे. मीडियातील बातम्यांनुसार तुम्हाला माहित झालंच असेल, की काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनेही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकूण 56 सदस्यसंख्या होत असल्यामुळे सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली.

पीडीपी नेत्याने दिलेल्या माहितीनुसार एकूण 60 आमदारांचा सरकार सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा होता. दरम्यान, यादीमध्ये 56 आमदारांचीच नावे देण्यात आली होती. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा, कलम 35 (A) आणि कलम 370 वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पीडीपीने दिली.

विधानसभा विसर्जित केल्यामुळे आता नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. विधानसभा विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत नवीन निवडणुका घेतल्या जातात.