रावसाहेब दानवेंनी वापरलेला शब्द मंत्री गुलाबराव पाटलांनीही वापरला, भाजपला म्हणाले,….

| Updated on: Jan 20, 2020 | 12:34 PM

शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले.

रावसाहेब दानवेंनी वापरलेला शब्द मंत्री गुलाबराव पाटलांनीही वापरला, भाजपला म्हणाले,....
Follow us on

जळगाव : शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन भाजपच्या नेत्यांवर आगपाखड करताना आक्रमक पवित्रा घेतला. ‘सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते खाऊन. भोगावे लागले इथेच’, असे वक्तव्य त्यांनी (Minister Gulabrao Patil) केले.

यापूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वापरलेला शब्द गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर टीका करताना वापरला. भडगाव इथे एक छोटेखानी राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांवर मत मांडले.

युतीच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीवेळी आमची भाजपसोबत युती होती. भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी आम्ही अंग झटकून मेहनत केली. रात्रीचा दिवस केला. त्यांचा चहाही प्यायलो नाही. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने युती धर्माचे पालन केले नाही. आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात बंडखोर पेरले. सालेहो सेटींग करता, तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

कसेही असो आता आम्ही सत्तेत

विरोधक म्हणत आहेत की आमचे सरकार फार काळ टिकणार नाही. मात्र, कसेही असो आम्ही आता सत्तेत आहोत. आमचा मुख्यमंत्री आहे, असा चिमटादेखील गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना काढला.

अधिकाऱ्यांच्या पायाही पडू आणि गच्चीही पकडू

आपली झलक सबसे अलग अशीच आहे. आमदार नव्हतो तरीही आपण आमदारासारखंच होतो. आमची ताकद आहे गच्ची पकडून काम करुन घ्यायची, हात जोडून कामं करुन घ्यायचं आणि पाया पडून कामं करुन घ्यायचं. या तिन्ही स्टाईल आमच्याकडे आहेत. चांगला अधिकारी असेल तर पाया पडून काम करुन घेऊ. देवासारखा असेल तर नमस्कार करु, जर आगाऊ अधिकारी असेल तर गच्चीही पकडू, तिन्ही स्टाईल आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.