उनको नक्षली, तो मुझे गांधीजीं के विचार पसंद थे; आमदार झालेल्या नक्षली नेत्या ‘भारत जोडो’त!

| Updated on: Nov 19, 2022 | 11:57 AM

वयाच्या 15 व्या वर्षी वारांगल मुलूगु येथील सीताक्का घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे नक्षली कारवाईत सहभागी झाल्या होत्या. तब्बल 10 ते 15 वर्ष त्यांनी नक्षली चळवळीत सक्रियपणे काम केले.

उनको नक्षली, तो मुझे गांधीजीं के विचार पसंद थे; आमदार झालेल्या नक्षली नेत्या भारत जोडोत!
उनको नक्षली, तो मुझे गांधीजीं के विचार पसंद थे; आमदार झालेल्या नक्षली नेत्या 'भारत जोडो'त!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कालच्या त्यांच्या शेगावच्या सभेला एक लाखाहून अधिक लोक आले होते. कोणतेही निमंत्रण न देता, कोणतीही हाक न देता, कोणताही प्रचार न करता सुरू असलेल्या या यात्रेला लाखो लोक आल्याने काँग्रेसवरील लोकांचा विश्वास वाढू लागल्याचं अधोरेखित होत आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे नेते सहभागी होत आहेत. अनेक सामान्य नागरीक आणि समाजातील विविध घटकातील लोकही या यात्रेत सहभागी होत आहेत. काल बुलढाण्यातील या यात्रेत नक्षलवाद सोडून आमदार झालेल्या सीताक्काही सहभागी झाल्या. उनको नक्षली, तो मुझे गांधीजीं के विचार पसंद थे, असं सांगत सीताक्काने मुख्यप्रवाहात येण्याचं कारणही सांगितलं.

वारांगल मुलूगु येथील सीताक्का भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना आपला पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. देशाच्या विकासासाठी आणि भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठीच आपण भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत त्या तेलंगाणा येथून सहभागी झाल्या आहेत. त्या दररोज त्यांच्यासोबत पदयात्रा करतात. भर जोडोच्या माध्यमातून खरोखरच समाज परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

घरची परिस्थिती आणि नक्षल्यांचा प्रभाव यातून पती आणि भावांचा नक्षल्यांशी संबंध आला. त्यामुळे सीताक्कांनी नक्षली म्हणून स्वतःलाही त्यात झोकून दिले. मात्र, मनात गांधीवाद असल्याने अखेर नक्षलवाद सोडला. राजकारणात आल्या आणि निवडणूक लढवून सीतक्का आमदारही झाल्या.

वयाच्या 15 व्या वर्षी वारांगल मुलूगु येथील सीताक्का घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे नक्षली कारवाईत सहभागी झाल्या होत्या. तब्बल 10 ते 15 वर्ष त्यांनी नक्षली चळवळीत सक्रियपणे काम केले. त्यांचे पती आणि भाऊही त्यात सहभागी होते. यादरम्यान त्यांना मुलेही झाली. त्यांची जबाबदारी, योग्य शिक्षण आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांनी नक्षलवाद सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्धार केला.

त्यांच्यावर गांधीवादाचा प्रभाव होताच. गांधीवाद आणि कुटुंबाची जबाबदारी डोळ्यासमोर दिसत होत्या. त्यामुळे अखेर त्यांनी नक्षल्यांशी कायमचे संबंध तोडले. पण रक्तातील कार्यकर्ती स्वस्त बसू देत नव्हती. अखेर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तेलगू देसम पक्षाकडून निवडणूक लढवली. तिथे त्या फार काळ रमल्या नाहीत.

त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर वारांगल मुलूगु येथून निवडणूक लढवली आणि थेट विधानसभेत पोहोचल्या.