Raj Thackeray | राज ठाकरे म्हणजे ‘माघार नायक’? त्या 10 घोषणा… ज्या प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत, धरसोड बुमरँग होतेय?

शिवसेनेपेक्षा जास्त ताकतीने राज ठाकरे एखादी भूमिका मांडतात, अवघ्या महाराष्ट्रात रान पेटवतात, शेकडो केसेस अंगावर घेण्याची ताकदही बाळगतात, मग असं काय घडतं की अनेक ठिकाणी त्यांना बॅकफूटवर जावं लागतं.

Raj Thackeray | राज ठाकरे म्हणजे 'माघार नायक'? त्या 10 घोषणा... ज्या प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत, धरसोड बुमरँग होतेय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 5:31 PM

मुंबईः राज ठाकरेंचा अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा अचानक रद्द झाला अन् एवढ्या मोठ्या घोषणेतून नेत्याने माघार कशी घेतली, या धक्क्याने कार्यकर्ते (MNS Activists) संभ्रमात पडले. 5 जून रोजी त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. जिल्ह्या-जिल्ह्यातून चलो अयोध्या… ची तयारी सुरु केली. पण काल हा दौराच रद्द केल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरलं. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं गेलं, पण त्यात कितपत तथ्य आहे, यावरही चर्चा घडतायत. या निमित्तानं राज ठाकरे यांनी मनसेच्या कारकीर्दीत घेतलेल्या भूमिका आणि त्यातील माघारींचे दाखले दिले जात आहेत.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष या नात्याने जेव्हा पक्ष म्हणून भूमिका मांडतात, तेव्हा लोक त्यांच्या कृतीवरही लक्ष ठेवून असतात. त्यामुळेच मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंत राज ठाकरेंनी ज्या काही भूमिका घेतल्या आहेत, त्या कितपत खऱ्या उतरल्या? काही काळातच त्यावर घुमजाव झालं? हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. शिवसेनेपेक्षा (ShivSena) जास्त ताकतीने ते एखादी भूमिका मांडतात, अवघ्या महाराष्ट्रात रान पेटवतात, शेकडो केसेस अंगावर घेण्याची ताकदही बाळगतात, मग असं काय घडतं की अनेक ठिकाणी त्यांना बॅकफूटवर जावं लागतं. आपल्या भूमिकांशी ठाम राहणारा पक्ष, नेता म्हणून मनसे इथं तर कमी पडत नाहीये, यावरही चर्चा होतेय. किंबहुना ही धरसोड वृत्तीच राज ठाकरेंवर बुमरँग होतेय का, अशीही भीती व्यक्त होतेय. पाहुयात यापैकी 10 प्रमुख भूमिका.

1. मराठीचा मुद्दा-

मनसेच्या स्थापनेनंतर 13 वर्षांपूर्वी सर्वप्रथम राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका घेतली. दुकानांवर, सरकारी कार्यालयांवर मराठीतूनच पाट्या असाव्यात, यासाठी आंदोलन केलं. इंग्रजी भाषेतील पाट्या बदलल्या नाहीत खळ्ळ खट्याक् चा इशारा दिला. मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकानांच्या पाट्या काढून आंदोलन केलं, मात्र काही दिवसात हा आक्षेप कमी झाला. त्यानंतर 2022 मध्येच महाविकास आघाडीनं मराठी पाट्यांसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर मनसेला जाग आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी हे आपल्याच मागणीचं फलित असल्याचं म्हटलं आणि त्यांचे आभार मानले.

MNS Protest

मराठी पाट्यांसाठीचं आंदोलन

2. उत्तरभारतीयांचा विरोध –

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्यासाठी हेच आंदोलन कारणीभूत समजलं जातंय. 2008 मध्ये मनसेनं उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन छेडलं. मुंबई आणि महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये उत्तर भारतीय, बिहारी तरुणांनाच स्थान दिलं जातं, मराठी तरुण बेरोजगार राहतात, असा आरोप करत त्यांना महाराष्ट्रातच प्रवेश दिला जाऊ नये, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. याच वर्षी रेल्वे भरतीसाठी बिहारहून आलेल्या उमेदवारांना मनसैनिकांनी मारहाणही केली होती. उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी याच भूमिकेसाठी राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी अशी मागणी केली आहे. 2008 मध्ये सुरु झालेलं हे आंदोलनही काही काळानंतर शमलं.

हे सुद्धा वाचा

MNS Agitation

3. टोल नाके आंदोलन-

राज्यभरात रस्त्यांची दुरवस्था होत असून सरकार सामान्य प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा टोल वसुली करते. जोपर्यंत रस्ते सुधारत नाहीत, तोपर्यंत नागरिकांकडून टोलवसुली केली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. 2014 मध्ये महाराष्ट्रभर या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. मुंबई, ठाणे, पुण्यासह औरंगाबाद, नागपूर आदी शहरांमध्ये टोल वसुली बंद करण्यात आली. अनेक टोल बूथची तोडफोड करण्यात आली. यासाठी अनेक मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. पण काही काळात हे आंदोलनही शमलं. टोलवसुली आजही जैसे थेच आहे.

4. मोदींची स्तुती, नंतर विरोध, आता पुन्हा स्तुती-

2011 मध्ये राज ठाकरे गुजरातच्या दौऱ्यावर गेले तेव्हा गुजरातचं विकास मॉडेल पाहून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींना त्यांनी उघड पाठींबा दिला. मात्र 2019 मध्ये शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत मोदींवर टीका सुरु केली. यापूर्वी मोदींची प्रशंसा करून मोठी चूक केल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये सत्तेत स्थान मिळवतील, असे तर्क लावले जाऊ लागले. मात्र राज ठाकरे तेव्हाही अचानक पवारांपासूनही दूर केले. आता पु्न्हा एकदा राज ठाकरेंनी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारचं कौतुक केलं. तिथेच विकास होतोय, हे आवर्जून सांगितलं.

5 EVM विरोधातलं आंदोलन

2019 च्या निवडणुकांनंतर EVM विरोधात आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. मात्र याच काळात त्यांना ईडीने चौकशीला बोलावले. त्यानंतर त्यांची ही भूमिका देखील मवाळ झाली.

6. CAA- NRC कायद्याला आधी पाठींबा..

पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढण्यासाठी राज ठाकरे यांनी 2020 मध्ये केंद्र सरकारच्या CAA NRC या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं समर्थन केलं होतं. मात्र काहीच दिवसात आपलं कायदा दुरुस्तीला समर्थन नसून पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना विरोध आहे, असं घुमजाव राज ठाकरेंनी केलं.

Raj Thackeray- Modi

7. विधानसभा निवडणुकीतून माघार

पक्ष स्थापनेनंतर पहिल्याच झटक्यात मनेसचे 13 आमदार निवडून आल्याने मनसेकडे जो आत्मविश्वास निर्माण झाला होता. तो कालांतराने कमी होत गेला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत अनेक सभा गाजवल्या. त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा पक्ष पूर्ण ताकतीने उतरेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. आपण स्वतः विधानसभेत उतरू असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं मात्र नंतर महाराष्ट्र हाच माझा मतदार संघ आहे, असं म्हणत त्यांनी विधानसभा निवडणुकीतूनही माघार घेतली.

8. लोकसभेला भाजपविरोधात उमेदवार नाही

2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर शरद पवारांशी जवळीक साधल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील मनसे लोकसभा व निवडणुकीत किमान दोन जागांवर उमेदवार उभा करेल, अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतूनही माघार घेतली.

9. अयोध्या दौरा-

3 मे रोजी औरंगाबाद येथील सभेला संबोधताना राज ठाकरे यांनी येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. तेव्हापासून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. पण उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यालाच आव्हान दिलं. उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाय ठेवू नका, असा इशारा दिला. बृजभूषण यांची मागणी अधिकच तीव्र होत गेल्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याचं जाहीर केलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसाठी ही घोषणा बुमरँग ठरू शकते, असं बोललं जातंय.

MNS

रद्द झालेल्या अयोध्या दौऱ्याचे पोस्टर्स

10. महाआरतीची घोषणा जी झालीच नाही-

या वर्षी 04 मे रोजी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे मशिदींवरील भोंग्यांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. ईदपूर्वी राज्यातील सर्व मशिदींवरचे भोंगे उतरले पाहिजेत, अन्यथा मनसेतर्फे महाआरती केली जाईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी औरंगाबादेत केली होती. मात्र काहीच दिवसात सणासुदीत वातावरण बिघडू नये, म्हणून आपण ही आरती करणार नाहीत, असं राज ठाकरेंनी ट्विटरद्वारे जाहीर केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.