फलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस

| Updated on: Aug 23, 2019 | 4:14 PM

ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेनेही ईडीला नोटीस पाठवली आहे. फलक मराठीत लावा असं मनसेने म्हटलं आहे.

फलक मराठीत लावा, मनसेची ईडीला नोटीस
Follow us on

MNS notice to ED मुंबई : कोहिनूर मिल जमीन खरेदीप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चौकशी सुरु आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) नोटीस पाठवून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना काल म्हणजेच 22 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांची काल जवळपास 9 तास चौकशी झाली.

ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेनेही ईडीला नोटीस पाठवली आहे.  “महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, त्यामुळे त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्या नोटीसची प्रत ईडीला पाठवली”, असं मनसेने म्हटलं. शिवाय मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का?  असा सवालही मनसेने विचारला.

ईडीला नोटीस पाठवल्याची माहिती मनसेने ट्विटरद्वारे दिली.

यापूर्वी मनसेने दुकानांवरील पाट्यांसाठी आंदोलन केलं होतं. दुकानावरील पाट्या मराठीत हव्या यासाठी मनसेने आंदोलन केलं होतं. त्यामुळे आता नोटीस पाठवणाऱ्या ईडीला मनसेने नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केली आहे.

मनसेच्या या नोटीसनंतर ईडी कार्यालयावर मराठीत अंमलबजावणी संचालनालय ही अक्षरे झळकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या ईडी कार्यालयाबाहेर जो फलक आहे, त्यावर हिंदीमध्ये प्रवर्तन निदेशालय असं लिहलं आहे. त्याखाली Enforcement Directorate असं इंग्रजीत लिहिलं आहे.

राज ठाकरेंची नऊ तास चौकशी

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल  सकाळी 11.30 वाजता सुरु झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसमोरची पहिली प्रतिक्रिया होती. राज ठाकरेंचे कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते. सकाळी राज ठाकरेंना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय बाजूच्याच हॉटेलमध्ये थांबले.

9 नंबरची गाडी, 9 तास चौकशी आणि 9 वाजता घरी

राज ठाकरे सकाळी त्यांच्या 9 या लकी क्रमांकाच्या गाडीत बसून ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले होते. यानंतर त्यांची चौकशीही 9 तास चालली आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते रात्री 9 वाजता घरी पोहचले. असा नऊचा योगायोग पाहायला मिळाला.

संबंधित बातम्या 

ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला 

तुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज